आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनांची सोय:दसरा मेळाव्यासाठी खासगी वाहनांचा आधार

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रोत्सवामुळे बस उपलब्ध नसून शिवसेना व शिंदेसेनेला खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. शहरातील सुमारे १३० वाहने “बूक’ केली आहेत. शिवसेनेकडून रेल्वेची सोय करण्यात आली. शिंदेसेनेने १८५० वाहनांची सोय केल्याचे समजते.

सुरुवातीला आरोग्यमंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत यांनी मुंबईला दसरा मेळाव्यास जाण्यासाठी बसची व्यवस्था करणार असल्याचे हिंदू गर्वगर्जना मेळाव्यात सांगितले होते. मात्र, नवरात्र तसेच चैत्री पौर्णिमेला तुळजापूरला मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर बसचा अगोदरच तुटवडा असतो. त्यात दसरा मेळाव्यासाठी बस उपलब्ध करणे शक्य नसल्याचा अंदाज होता. यामुळे उस्मानाबाद विभाग नियंत्रक कार्यालयाला प्रासंगिक करारावर बस सोडण्याचा कोणताही आदेश आला नाही. यामुळे जिल्ह्यातील एकही बस कोणत्याही गटाला दसरा मेळाव्यासाठी उपलब्ध होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ३००० शिवसैनिकांसाठी २४ बोगींची रेल्वे ठरवण्यात आल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास ही रेल्वे रवाना होणार असल्याचे पूर्वीच जाहिर करण्यात आले होते. शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार १८५० वाहनांची व्यवस्था केली असून सुमारे २० हजार शिवसैनिक मेळाव्यासाठी जाणार आहेत. त्यामध्ये उस्मानाबाद - कळंब मतदारसंघातील शिवसैनिक ४०० क्रुझर व ५० टेंपो ट्रँव्हलर , भूम - परंडा - वाशी मतदार संघातील शिवसैनिक ७०० क्रुझर , उमरगा - लोहारा - तुळजापुर मतदारसंघातील शिवसैनिक ७०० क्रुझर असे एकूण १८५० वाहनांची व्यवस्था केली आहे.

याबाबत बोलताना विभागीय नियंत्रक चेतना खिरवाडकर म्हणाल्या की, प्रासंगिक कराराचे कोणतेही शेड्युल जिल्ह्याला मिळालेले नाही. कदाचित दसरा व आश्विन पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बसेसचा प्रासंगिक करार झालेला नसावा. तुळजापूर यात्रेसाठीच येथे मोठ्या प्रमाणात बसची आवश्यकता असते.

शहरात केवळ १३० वाहनांची बुकिंग
उस्मानाबादेत विविध वाहनमालकांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील १३० वाहने बूक करण्यात आली आहेत. यामध्येही लहान वाहनांपासून अधिक प्रवासी क्षमतेच्या वाहनांचा समावेश आहे. काही ग्रामीण भागातील वाहनेही ठरवली आहेत. अनेक शिवसैनिकांचे मंगळवारी रात्री तर काहींचे बुधवारी पहाटे मुुंबईला जाण्याचे नियोजन होते. दोन्ही गटांकडून शिवसैनिक वाहने नेण्यासाठी आल्याचे वाहनचालक-मालक संघटनेेचे उत्तम पोटभरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...