आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधान:रान झालं आबादानी ; पावसाने खासापुरी प्रकल्प सलग तिसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो

परंडा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांत पावसाचे पुनरागमन झाल्याने पिकांना दिलासा मिळाला असून, काही भागात वाया जाणाऱ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. सततच्या पावसाने तालुक्यातील खासापुरी मध्यम प्रकल्प सलग तिसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरून सांडवा सुटला. यापूर्वी चांदणी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे तर सीना-कोळेगाव प्रकल्पाच्या जलसाठ्यात ३५ टक्के वाढ झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

तालुक्यात मागील काही दिवसांपासून अनाळा, आसू व जवळा (नि) मंडळात दमदार पाऊस होत असल्याने १९५६ साली पूर्ण झालेला खासापुरी मध्यम प्रकल्प सलग तिसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो होऊन सांडवा सुटला आहे. चांदणी मध्यम प्रकल्प ९ ऑगस्ट २०२२ रोजी ओव्हरफ्लो होऊन दोन दरवाजे उघडले गेले होते. निम्नखैरी बृहतलघु प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून दोन दिवसात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे तर मुगाव, सोनारी लघु प्रकल्प भरले आहेत. सर्वात मोठ्या सीना-कोळेगाव प्रकल्पात ५५ टक्के जीवंत पाणीसाठा पाणीसाठा झाला आहे. तालुक्यातील सर्व लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या मुबलक जलसाठा झाल्याने सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.

तालुक्यात सीना-कोळेगाव या मोठ्या प्रकल्पासह खासापूरी, साकत, चांदणी व खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्प आहेत. खासापूरी प्रकल्पाची १३.५९ दलघमी पाणी क्षमता आहे त्यापैकी १३.५९ दलघमी पाणीसाठा झाला आहे. तर चांदणी प्रकल्पाची क्षमता २३.७८ दलघमी असून २२.२७ दलघमी पाणीसाठा असल्याने दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरले आहेत. शिवाय साकत मध्यम प्रकल्पाची १४.४९ दलघमी पाणी क्षमता असुन २.६६ दलघमी पाणीसाठा होत १२ टक्क्यांपर्यंत भरले आहे. सततच्या पावसाने आवक सुरू असल्याने हा प्रकल्प या आठवड्यात शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांपूर्वी खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्पाचा भराव खचल्याने सांडवा फोडलेल्या खंडेश्वर प्रकल्पात अद्याप साठवण सुुरू केली गेलेली नाही.

त्यामुळे १० दलघमी क्षमता असलेला हा मध्यम प्रकल्प मृतसाठ्यात आहे. मुगाव व सोनारी लघु प्रकल्प शंंभर टक्के भरला असून शेळगाव व वाटेफळ साठवण तलावात अद्याप पाणीसाठा झालेला नाही. खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्पाच्या भरावाची दुरुस्ती न झाल्याने पाणी वाया जात आहे. उर्वरित काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने उर्वरित तलावही आठवडाभरात भरण्याची शक्यता आहे. खासापूरी व चांदणी मध्यम प्रकल्प पूर्ण भरल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचन क्षेत्रात वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उस्मानाबादेत तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस
जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाची बरसात सुरू आहे. सोमवारी दुपारी उस्मानाबाद शहरातही जोरदार सरी बरसल्या. त्यानंतर कळंब भागातही चांगल्या पावसाला सुरूवात झाली. उस्मानाबादमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सलग पाऊस पडत आहे. यामुळे भोगावती नदी खळाळून वाहू लागली आहे. पावसाने तालुक्यातील छोटे प्रकल्प ओसंडून वाहू लागले आहेत. तर शहरानजिकच्या हातलाई तलावातील पाणीसाठ्याही चांगली वाढ झाली आहे. तालुक्यातील तेरणा धरण गेल्या महिन्यातच ओव्हरफ्लो झाले आहे.दरम्यान,दुरूस्तीअभावी रखडलेल्या उस्मानाबादेतील रस्त्यांची या पावसाने अधिकच दैनावस्था झाली आहे. गेल्या काही वर्षापासून शहरातील रस्त्यांची दुरूस्तीच झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...