आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादया, क्षमा, शांती आणि करुणा भाव हा संत विचारांचा पाया आहे. जगाच्या कल्याणाची भूमिका संतांनी नेहमीच मांडली. त्यामुळे संत क्षमाशील व संवेदनशील असतात. सकारात्मक विचार समाजात पसरला पाहिजे, हा सुध्दा संत विचारांचा पाया आहे. राग, लोभ आणि तत्सम विखार संपले की, संत विचारांच्या जवळ पोहोचता येते. कारण, निरपेक्ष प्रेम ही संत विचारांची शिकवण आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार बंडा तात्या कराडकर यांनी केले.
तेर येथील संतधाम परिसरात हभप. गुरुवर्य संदीपान महाराज शिंदे-पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित अमृत महोत्सवाची सुरुवात बंडा तात्या कराडकर यांच्या कीर्तनाने झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संतपीठावर गुरुवर्य संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगावकर, महादेव महाराज बोराडे, जगन्नाथ महाराज देशमुख, शिवाजी महाराज गोवर्धनवाडीकर, नाना महाराज कदम, पद्मनाथ महाराज व्यास, नारायण उत्तरेश्वर, रघुनंदन महाराज, नायगावकर बाबा, रामकृष्ण शिंदे-पाटील, किरण सूर्यवंशी, दिनेश जाधव, विवेकानंद शिंदे-पाटील, शरद जाधव उपस्थित होते.
कराडकर म्हणाले की, विखार टाळले की, माणूस विवेकशील बनतो. त्यामुळे विवेकातून सामाजिक प्रगती साधण्यासाठी संत विचारांची समाजाला गरज आहे. आयुष्यभर संदिपान महाराज ज्या विचारासाठी जगले, तो विचार या सोहळ्यात पावलोपावली दिसत आहे. या अमृत सोहळ्याच्या दुपार सत्रात संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज कान्होबा महाराज देहूकर, संत व्यंकट महाराज संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे, श्री क्षेत्र नागेश्वर संस्थान मुर्तडचे शिवकृष्णयोगी गंजीधर बाबा यांचे प्रवचन झाले. सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, गायक, वादक, फडकरी, उपस्थित होते.
तुमची शताब्दी साजरी करण्याचा योग यावा: पाटील
संदिपान महाराज शिंदे-पाटील हासेगावकर यांना फार पूर्वीपासून बघतो आहे. त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात खूप मोठे काम केले आहे. वारकरी परंपरेचे शिक्षण देणारी संस्था उभारण्यात त्यांचे लक्षणीय योगदान असून त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यामुळे तेरचा कायापालट करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. तसेच त्यांची शताब्दी साजरी करण्याचा योग यावा, अशा शुभेच्छा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या.
देत रहाणं ही आध्यात्मिक वृत्ती : लाड महाराज
विश्वाच्या कल्याणाची कामना संत शिकवण करते. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांला पाणी आणि गरजूंना वस्त्र देण्याची वृत्ती म्हणजे संत विचारांचे अनुकरण असते. मानवता ही अध्यात्माची देणगी आहे. त्यामुळे देणं ही आध्यात्मिक वृत्ती आहे. ती वृत्ती हभप. संदिपान महाराज यांनी जोपासली आहे. त्यामुळे संत विचाराने लोकांचे प्रबोधन करण्यात त्यांनी आयुष्य खर्ची घातले. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे गौरवोद्गार व्याकरणाचार्य हभप. अर्जुन महाराज लाड यांनी आपल्या हरि कीर्तनातून काढले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.