आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सज्जता:उमरग्यात खरीप पेरणीपूर्व मशागतीला वेग; खते, बी-बियाण्यांचे नियोजन सुरू

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र खरिपाचे असून त्यात कोरडवाहू क्षेत्र सर्वाधिक आहे. यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस दहा दिवस अगोदरच येण्याची शक्यता आहे, यामुळे शेतकरी भर उन्हात पेरणीपूर्व मशागतीच्या कामामध्ये व्यस्त आहेत. आधुनिक यांत्रिकीकरणाचा जोर वाढल्याने पशुधन कमी झाले असून मजुरांची वानवा, महागाईचे चटके सहन करीत शेतकरी मशागतीचे काम उन्हात करत आहेत. गतवर्षीच्या हंगामात जेमतेम उत्पन्न निघाल्याने त्यात विमा कंपनीने हवालदिल केल्याने शेतकरी असमाधानी दिसून येत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार चांगल्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षात दहा दिवस अगोदरच पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी मृग नक्षत्र सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी शिल्लक असल्याने पावसाळ्यापूर्वी शेतीतील कामे पूर्ण करून पेरणीसाठी शेतजमीन तयार ठेवण्याच्या कामात शेतकरी गुंतल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या शेतात धसकटे काढणे, शेणखत टाकणे, औत मारणे, नांगरणी आदी कामे सुरू आहेत. तालुक्यातील काही शेतकरी बैलजोडीने तर काही शेतकरी ट्रॅक्टरच्या मदतीने मशागतीचे कामे करण्यात व्यस्त आहेत.

निसर्गाच्या आशेवर वर्षाचे आर्थिक अंदाज बांधत नियोजन करणारा शेतकरी यंदातरी भरघोस उत्पन्न निघेल या आशेवर पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेण्याच्या घाईत आहेत. सर्वकाही सुखकर होइल, काढलेले कर्ज निघालेल्या उत्पन्नावर फेडता येईल, या आशेने मशागतीचे काम सुरू केल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. वर्षात रब्बी व खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असून खरीप हंगाम सुरू होणार असल्याने आर्थिक चणचण असताना त्यात पीकविम्याची प्रतीक्षा करत उसनवारी करून काळ्या आईची ओटी भरण्याची तयारी करावी लागत असल्याचे तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत.

बी-बियाणे आणि खत विक्रेते प्रतीक्षेत: हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सून लवकरच येण्याची शक्यता गृहीत धरून तालुक्यातील बी-बियाणे व खत विक्रेत्यांनी विविध कंपनीचे खते व बियाण्यांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. कृषी विभाग त्यासाठी सज्ज झाला असून बी-बियाणे व खते विक्रेत्यांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

आधुनिक शेतीला प्राधान्य
यंत्राच्या वापरामुळे शेतीकाम करणाऱ्या बैलजोडीचे महत्त्व ग्रामीण भागातही कमी होत चालले असून बहुतांश शेतकरी शेतीकामासाठी यांत्रिकी साधनांचा वापर करत असल्याने बैलजोडीचे महत्त्व कमी होत आहे. कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या देशामध्ये शेतीला महत्त्व असून बदलत्या काळानुसार आधुनिक शेती नावारूपास आली. शेती क्षेत्रात नवनवीन यांत्रिक साधनसामुग्रीचा वापर होत आहे. यामुळे पारंपरिक औजारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शेतात उभा राहून आधुनिक तंत्राद्वारे होणारी शेती डोळ्यांनी पहात आहेत. त्यामुळे शेतामध्ये राबणारी बैलजोडी हाकताना शेतकऱ्यांच्या मुखातून घुमणारा आवाज आता दमला आहे.

शेतीचीही कामे जोमात सुरू
सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शिवार रिकामे झाले असून शेतकरी शेतातील बांध बंदिस्ती, धसकट वेचणे, शेणखत टाकणे, नांगरणी, कुळव, जमीन सपाटीकरण, मोगडणी, बांधावर मुरुम व मातीचा भराव, पाला-पाचोळा जमा करणे, झाडांची खोडं काढणे आदी कामे जोमाने सुरू असून मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना स्वतःच काम करावे लागत आहे. काही ठिकाणी रब्बी हंगामातील उशीरा पेरा झालेल्या पिकांची काढणीची कामेही सुरू आहेत तर भारनियमनाची वेळ साधून ऊसाला पाणी देण्याच्या कामात शेतकरी गुंतला आहे.

उसनवारी करून काळ्या आईची ओटी भरण्याची तयारी
खरीप पेरणीचा हंगाम सुरू होणार आहे. यामुळे आर्थिक चणचण असतानाही उसनवारी करून काळ्या आईची ओटी भरण्याची तयारी करत आहे. गेल्या वर्षी सोयाबीनचे चांगले उत्पन्न झाले. परंतु अर्धा माल अद्याप विकला गेला नाही. आता पुन्हा उसनवारी करण्याची वेळ आली आहे. तरी पेरणीपूर्व कामे केल्यास चांगले उत्पन्न होण्याची आशा आहे.
-तात्याराव भोसले, शेतकरी.

बातम्या आणखी आहेत...