आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापद्मश्री पुरस्कार विजेते शेतीतज्ञ सुभाष पाळेकर यांच्या प्रेरणेतून तालुक्यातील जकेकूर येथील बसवराज जेवळे यांनी गुळ निर्मिती उद्योग सुरू केला. सेंद्रीय पद्धतीच्या निर्मिती होत असल्याने गुळाला प्रचंड मागणी वाढली आहे.
जेवळे यांच्याकडे ऊस शेती आहे. उद्योग उभारणीसाठी अडचणींवर मात करत वाटचाल सुरू आहे. जकेकूर येथे मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे ऊसाची शेती सर्वाधिक होते. जेवळे यांची येथे पाच एकर शेती आहे. आई, पत्नी, मुलगा असे त्यांचे कुटुंब. २०१४ पर्यंत गावात किराणा दुकानातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. शेतीतज्ञ सुभाष पाळेकर यांची सेंद्रीय शेतीबाबतची यूट्युबवर माहिती पाहिली. जेवळे यांनी २०१५ मध्ये किराणा दुकान बंद करुन सेंद्रीय शेतीला सुरुवात केली. पट्टा पद्धतीने ऊस लागवड केली. चार गावरान गायी घेतल्या. गाईचे मूत्र, शेणापासून जीवामृत, घनामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क, ताक फवारणी आदी सेंद्रीय निविष्ठा वापरुन ऊस उत्पादन सुरू केले. सेंद्रीय शेतीतून उत्पादीत केलेल्या ऊसापासून सेंद्रीय गुळ निर्मितीचा निर्णय घेतला व गुळ उद्योगाचा श्रीगणेशा झाला.
सेंद्रीय गुळनिर्मिती प्रक्रिया ऊसाची तोड करुन गाळप करण्यात येते. रस कळईत उकळता जातो. त्यानंतर त्याच्यातून मळी काढली जाते. या रसात औषधी गुणधर्म असणारी भेंडी व व घट्टपणा येण्यासाठी चुना टाकला जातो. ते वाफ्यात थंड करायला ठेवले जाते. त्यानंतर पाच किलो वजनानुसार गुळाची ढेप तयार केली जाते. सेंद्रीय गुळासाठी नैसर्गिक पद्धतीने ऊसाचे पीक घेतले जाते. ८६०३२ वाणाची लागवड केली आहे. लागवडीआधी शेणखत, ऊस लागवडीनंतर जीवामृत, घन जीवामृत, बिजामृत, ताकाची फवारणी केली जाते. नोव्हेंबरमध्ये गुळ हंगाम सुरू होतो. मे महिन्यापर्यंत हंगाम चालतो.
ऊसाची उपलब्धता होण्यासाठी टप्प्याटप्प्याने ऊस लागवड केल्याने गाळपासाठी टप्प्याने ऊस उपलब्ध होतो. नैसर्गिकरित्या शेतीमुळे एकरी २५ ते ३० टनापर्यंत उत्पादन मिळते. या सेंद्रीय गुळाला ७० रुपये किलो भाव असतानाही प्रचंड मागणी आहे. मागील सहा वर्षांपासून गुळ निर्मितीतून खर्च वजा जाता दरवर्षी एकरी दीड लाख रुपयांचा नफा होत आहे, असे जेवळे यांनी सांगितले.
शेतीवर दोन लाख रुपयांचे कर्ज काढून उभारणी
कौटुंबीक परिस्थिती बिकट असल्याने भांडवल नव्हते. शेतीवर दोन लाख रुपये बँकेचे कर्ज काढून अल्प खर्चात गुळनिर्मिती प्रकल्प शेतातच उभारला. रस उकळण्यासाठी कढई, चुलवण, त्याच्या बाजुला गुळासाठी वाफा तयार केला. शिवाय क्रशर ठेवला. कुटुंबातील सर्व सदस्य ऊस तोडतात. क्रशिंग करूम गुळ बनविण्यास मदत करतात. पाच किलोच्या गुळाचे डाग बनवून दिवसाला ५० किलो सेंद्रीय गुळ तयार करण्यात येतो. शिवाय पाक काकवी, गुळ पावडर, ऑर्डर प्रमाणे कार्यक्रमासाठी उसाचा रसही बनवला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.