आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन:जिल्हा परिषदेसह, आठ पंचायत समित्यांवर पुढील आठवड्यांपासून प्रशासक

उस्मानाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंचायत समित्यांचा कारभार १४ तर जिल्हा परिषदेचा २१ मार्चला होणार हस्तांतरित, निधी खर्चासाठी करावी लागणार पदाधिकाऱ्यांना धावपळ, प्रलंबित संचिकांवर अंतिम काम करण्यासही प्रारंभ

निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यास असमर्थता दाखवल्यामुळे अपेक्षेनुसार आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा कारभार प्रशासकांच्या हाती जाणार आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत २० तर आठही पंचायत समित्यांमध्ये १३ मार्चपासून प्रशासक राज लागू होणार आहे. जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी तर पंचायत समितीत संबंधित गटविकास अधिकारी कामकाज पाहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही राज्य सरकारवर ताशेरे ओढत योग्य प्रकारे इम्पेरिकल डाटा सादर न केल्यामुळे आरक्षण बहाल करण्यास तूर्त नकार दिला आहे. यामुळे राज्यात अभूतपुर्व राजकीय पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत.

राज्यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळ २० मार्चला संपणार आहे. यामुळे शासनाने घोषित केल्याप्रमाणे येथील कार्यभार आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता कार्यभार पाहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचाही कार्यभार संपणार आहे. त्यामुळे त्या-त्या पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी १३ मार्चपासून त्यांचे प्रशासक असणार आहेत. उस्मानाबाद पंचायत समितीवर बीडीओ सुरेश तायडे, वाशी पंचायत समितीवर नामदेव राजगुरू, भूम येथे बी. आर. ढवळशंख, परंडा येथे अमित कदम, तुळजापूर येथे प्रशांतसिंह मराेड, लोहारा शहरात सोपान अकेले, उमरगा येथे कुलदिप कांबळे तर कळंब पंचायत समितीवर आर. व्ही. चकोर प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान, लोहारा येथील सोपान अकेले यांची बदली झाली आहे. मात्र, त्यांनी अद्याप चार्ज सोडला नाही. त्यांनी चार्ज सोडला तर अन्य व्यक्तीला तेथे बसवून कार्यभार सांभाळण्यात येणार आहे.

प्रशासनाकडून आता दुर्लक्ष
पदाधिकाऱ्याचा कार्यकाळ संपत आल्याने काही अधिकाऱ्यांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा काहींचा अनुभव आहे. त्यात पुन्हा प्रशासक नेमण्यात येत असल्यामुळे पदाधिकाऱ्यांची चलबिचल वाढली. अपूर्ण संचिका योगय पद्धतीन पुढे नेण्यासाठी पदाधिकारी आता सक्रिय झाले आहेत.

कामांसाठी लगबग वाढली
आपला कार्यभार संपत आल्याचा अंदाज जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना आला होता. तेव्हापासून आपल्या खात्याअंर्गत अखर्चिक निधीची माहिती घेत निधी खर्च करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शेवटच्या टप्प्यात पदाधिकारी व काही सदस्य सातत्याने कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. कामे करून घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करताहेत.

माहिती घेण्यास सुरुवात
सध्या मार्च एन्ड असून विविध खात्यातील अधिकारी व कर्मचारी जमा-खर्चाचा ताळमेळ घालण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी जिल्हा परिषदेत बांधकाम विभागात कंत्राटदार फेऱ्या मारताहेत. अधिकाऱ्यांची मनधरणी सुरू आहे. प्रशासक काळात दायित्वाची रक्कम राहू नये, यासाठीही प्रयत्न आहेत. गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात दायित्व अडकले होते.

बातम्या आणखी आहेत...