आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऐतिहासिक पुरातन मौल्यवान सोन्या-चांदीचे मौल्यवान अलंकार व नाणी गायबप्रकरणी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना अटक झाल्यानंतर मोठे मासे गळाला लागणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
या प्रकरणात फिर्याद अपूर्ण असल्याने अडचणी येत आहेत. १९७५ पासून कागदपत्रे तपासण्यात येत असल्याने इतरांचा सहभाग आढळल्यास त्यांना तातडीने अटक करण्यात येईल, तर प्रशासकीय अधिकारी दोषी आढळल्यास कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक अंजुम शेख यांनी दिली. दरम्यान, नाईकवाडी यांनी त्यांच्या कार्यकाळात पदाचा दुरुपयोग करत मंदिर संस्थानचा खजिना व जामदारखान्यातील अतिप्राचीन, ऐतिहासिक व मौल्यवान ७१ प्राचीन नाण्यांसह भाविकांनी अर्पण केलेले ३४८.६६१ ग्रॅम सोने व सुमारे ७१६९८.२७४ ग्रॅम चांदीच्या वस्तूंचा वैयक्तिक स्वार्थासाठी अप्रामाणिक अपहार/चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
दानपेटी घोटाळ्यात बडे अधिकारी गुंतल्याने कारवाई नाही : तुळजाभवानी देवस्थानच्या दानपेटीच्या लिलावात मोठा घोटाळा संघटितरीत्या करण्यात आला आहे. याविषयी सन २०१० मध्ये शासनाच्या चौकशीत असे लक्षात आले की, देवस्थानचे एका वर्षाचे सरासरी उत्पन्न साधारण ४ कोटी ६३ लाख रुपये आहे; परंतु दानपेटीचा लिलाव केवळ ०२ कोटी ६७ लाख रुपयांना देण्यात आला होता. म्हणजे वर्षाला ०२ कोटी रुपयांचा तोटा देवस्थानला झाला आहे. अशा प्रकारे वर्ष १९९१ ते वर्ष २०१० पर्यंत म्हणजे २० वर्षांत अंदाजे ४० कोटींहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार दानपेटीच्या माध्यमातून झाल्याचा आरोप आहे. यामध्ये काही जिल्हाधिकारी, तहसीलदार, लोकप्रतिनिधी व कंत्राटदार गुंतलेले आहेत. बडे अधिकारी असल्यामुळे जवळजवळ २३ अधिकाऱ्यांची चौकशी होऊनही कुणावरही कारवाई नाही.
नाईकवाडी यांना सेवानिवृत्तीनंतर वारंवार मुदतवाढ
दिलीप नाईकवाडी सेवानिवृत्त झाल्यानंतर तातडीने एकत्रित वेतनावर ( फिक्स पेमेंट) ११ महिन्यांची ऑर्डर दिली व धार्मिक व्यवस्थापक पदाचा भार पुन्हा सोपवला. त्यानंतर परत एकदा ११ महिन्यांची, नंतर ३ महिन्यांची व शेवटी १ महिन्याची मुदतवाढ नाईकवाडी यांना देण्यात आली. तर शेवटी नाईकवाडी यांच्याकडे नव्याने पदनिर्मिती करत जनसंपर्क अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
तत्कालीन इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याची शंका
पदभार स्वीकारताना अनियमितता झाल्याचे तसेच दप्तरी नोंदीप्रमाणे चार्ज पट्टीत दागिने न येण्याचा अहवाल वरिष्ठांना कळवणे आवश्यक होते. मात्र असे न होता पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांच्या तक्रारीनंतर नाणी, दागिने गायब असल्याचे चव्हाट्यावर आले. मात्र त्यानंतर चौकशीचा फार्स होऊन केवळ नाईकवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले . तत्कालीन इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
ऐतिहासिक दागिने चार्ज पट्टीत न आल्याने घोटाळा उघड
नाईकवाडी यांच्या १८ वर्षांच्या धार्मिक व्यवस्थापक पदाच्या सेवानिवृत्तीनंतर १६ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांचा पदभार सिद्धेश्वर इंतुले यांच्याकडे सोपवण्यात आला. पदभार हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तिघांची समिती नेमून त्यांचा देखरेखीखाली पदभार सोपवण्याचे आदेश होते. मंदिर संस्थानच्या दप्तरी नोंद असलेले अनेक मौल्यवान, ऐतिहासिक दागिने चार्ज पट्टीत न आल्याने एकच गोंधळ उडाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.