आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

धक्कादायक:अंत्यविधीनंतर अहवाल पॉझिटिव्ह, शंभरावर नातलगांचे धाबे; संशयित रुग्ण पुरूष असताना महिला दाखवल्याचा आरोप

उस्मानाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाचा निष्काळजीपणा

उपचारासाठी दाखल कोविड संशयित असलेल्या रुग्णाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. सिव्हिल प्रशासनाने आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट न आल्याने अँटिजन टेस्ट करून ती निगेटिव्ह आल्याचे सांगत मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला. त्यानुसार, रविवारी सकाळी नातलग व जवळच्या शंभरावर व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कारही पार पडले. परंतु, सदरील मृताची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर येताच नातलगांचे धाबे दणाणले असून सिव्हिल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप नातलगांनी केला आहे.

याबाबत माहिती अशी की, नळदुर्ग येथील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास (६५) कोविड सदृश लक्षणांमुळे ८ ऑगस्ट रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे स्वॅब नमुने घेऊन औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. ११ सप्टेंबरच्या प्रयोगशाळेच्या अहवालात सदरील व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचेही समोर आले. परंतु, सिव्हिल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हा रिपोर्ट आमच्याकडे आलाच नाही. त्या दरम्यान, शनिवारी (दि.१२) रात्री त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या वेळी सिव्हिल प्रशासनाने सदरील मृतदेहाची अँटिजन टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आल्याने मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. नातलगांनी सदरील मृतदेह नळदुर्ग येथे नेऊन रविवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान नातलगांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कारही केले. दरम्यान, त्यांच्या पुतण्याने आरटीपीसीआर रिपोर्ट मिळविला असता यामध्ये सदरील व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आणि नातलगांमध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे उशिराने येणारे रिपोर्ट व सिव्हिलमधील निष्काळजीपणा या दोन्ही बाबी चव्हाट्यावर आल्या आहेत.

सीएस म्हणतात आमच्याकडे रिपोर्टच आले नाहीत

याबाबत सदरील मृत व्यक्तीच्या भावाने जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. डी.के.पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली. यावेळी त्यांनी आरटीपीसीआरचे रिपोर्ट आम्हाला मिळालेलेच नव्हते. परंतु, नातलगांनी मृतदेहाची मागणी केल्याने आम्ही अँटिजन टेस्ट केली व ती निगेटिव्ह आल्याने मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले.

संशयित रुग्ण पुरूष असताना महिला दाखवल्याचा आरोप

११ सप्टेंबरचे पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आम्हाला मिळतात आणि रुग्णालय यंत्रणेला कसे मिळत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून संशयित रुग्णाच्या अंत्यविधीबाबतही शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन केले नाही. तसेच सदरील व्यक्तीच्या नावातही चूक करून ती व्यक्ती पुरूष असताना त्यांना महिला दाखवण्यात आले, असा आरोप रुग्णाच्या नातलगांनी केला.