आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लादल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्याने सामान्य जनता महागाईने होरपळत आहे. त्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. सर्वसामान्य जनतेच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि.५) जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशभरात केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूवर अन्यायकारकपणे जीएसटी कर लादला आहे. प्रथम सामान्य जनता महागाई व बेरोजगारीने बेजार असताना हा जाचक कर लादून परिस्थिती आणखी गंभीर केली आहे. त्यामुळे सामान्य जनता महागाईने होरपळून निघत आहे. जीएसटी कर तात्काळ हटवण्यात यावा. तसेच यावर्षी अतिवृष्टीमुळे राज्यात तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झालेले आहे. कित्येक ठिकाणी शेतात पावसाचे पाणी साचले आहे. या जमिनीमध्ये भविष्यात पिके घेता येणार नाहीत. काही ठिकाणी तर दुबार पेरणीही शक्य नाही. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत करावी, यावर्षीचे पीककर्ज माफ करावे, खरडून गेलेल्या व गाळ साचलेल्या शेतजमिनीच्या दुरूस्तीसाठी मदत मिळावी, फळ बागायतदारांना भरीव मदत करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन
मागण्यांचा विचार न झाल्यास जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, वरिष्ठ उपाध्यक्ष खलील सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, लक्ष्मण सरडे, विलास शाळू, डीसीसी बँकेचे संचालक महेबूब पटेल, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, उस्मानाबाद शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सरचिटणीस दादा पाटील आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.