आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कृषी विभागाची धुरा मागील दोन वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवरच असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी उपसंचालक पदासाठी नियमित अधिकारी मिळाले नाहीत. अन्य पदांचीही अशीच स्थिती असून फिल्डवरील कामासाठी आवश्यक असलेल्या कृषी सहाय्यकांची तब्बल ५१ पदे रिक्त आहेत. यामुळे एकाला एक किंवा दोन अतिरिक्त सज्जांचा कारभार पहावा लागत आहे.
जिल्ह्यात मोठा उद्योग नसून नागरिकांना शेतीशिवाय उत्पन्नाचे साधन नाही. जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने कृषी विभाग सक्षम असण्याची मोठी गरज आहे. मात्र, येथील जिल्हा कृषी विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागलेले आहे. मागील दाेन वर्षांपासून ते सुटायचे नाव घेत नाही. मुख्य म्हणजे जिल्हा अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी व उपसंचालक पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. राज्य शासनाकडून येथे नियमित अधिकारी पाठवण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. पूर्वी दीर्घकाळ याच पदावर कार्यरत असलेले जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी महेश तिर्थकर यांनी चांगले काम केले. तसेच त्यांच्या अगोदर व नंतरही काही दिवस कामकाज संभाळणारे अभिमन्यू काशिद यांनीही नियोजनपूर्वक काम केले. मात्र, दोघांनाही नियमित पद नसल्यामुळे काही मर्यादा आल्या होत्या. कृषी विभागाची धुरा कृषी सहायकांवरच असते. त्यांना वेगवेगळे सर्वेक्षण, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, पंचनामे, स्थळ पाहणीचे काम करावे लागते. मात्र, यासाठी सहाय्यक उपलब्ध नाही. तब्बल ५१ पदे कमी असल्यामुळे एका किंवा दोन सज्जांचा भार अतिरिक्तपणे सहन करावा लागत आहे.
चालकाविना वाहने पडून जिल्ह्यात चालकांची १३ पदे आहेत. मात्र, यातील केवळ पाच पदे भरलेली आहेत. उर्वरित आठ पदे भरण्यात आलेली नाहीत. यामुळे अनेक वाहने चालकाविना तशीच कार्यालयासमोर पडून आहेत. तुळजापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर अशीच एक जीप उभी आहेत. लिपिकांचीही अशीच स्थिती असून त्यांची १७ पदे रिक्त आहेत. त्यांना रात्री ११ पर्यंत काम करावे लागते.
कागदावर कमी पदे रिक्त, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी उणीव कृषी सहायकांची पदे कागदावर ५१ रिक्त असल्याचे दाखवण्यात आले आहे. २८७ पदे मंजूर असताना २३६ पदे भरलेली असल्याचे दिसत आहेत. प्रत्यक्षात १५ पेक्षा अधिक जणांना प्रतिनियुत्तीवर तालुका कार्यालयात कामासाठी घेतले आहे. तसेच नियमितपणे अधिकृत २० कृषी सहायकांची केवळ कार्यालयीन कामासाठी नियुक्ती आहे. यामुळे कागदावर ५१ पदे रिक्त दिसत असली तरी ९० पेक्षा अधिक कृषी सहायक फिल्डवर कमी आहेत.
सोमवारचा दिवस अधीक्षकांविना अभिमन्यु काशिद यांच्याकडील पदभार सोमवारी काढून त्यांना आत्मा विभागात नियुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी जिल्हा अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी म्हणून पुन्हा तिर्थकर यांच्याकडे पदभार दिल्याचे समजले. ते रजेवर गेल्यामुळेच काशिद यांच्याकडे पदभार आला होता. आता मात्र, तिर्थकर घरगुती अडचणींमुळे पदभार स्विकारण्यात त्यांनी स्वारस्य दाखवले नसल्याचे समजते. यामुळे सोमवारचा दिवस अधीक्षकांविनाच गेला. आता मंगळवारी कोण पदभार घेणार, हा प्रश्न आहे.
कृषी सहायक मानसिक दडपणात सध्या कृषी सहायकांना दोन किंवा तीन सज्जांचे काम पहावे लागत आहे. त्यात ऑनलाइन काम करावे लागत असल्याने दिलेल्या मुदतीत ते पार पाडावे लागते. अन्यथा कारवाईचा बडगा सहन करावा लागतो. यामुळे सध्या सर्वच कृषी सहायक मानसिक दडपणात आहेत. त्यांचा उद्रेक होऊन ते कधीही आंदोलनाच्या पवित्र्यात येऊ शकतात.
कामाचा ताण, चुकारपणा नाही पदांची भरती करण्यात आलेली नसल्यामुळे कामांचा मोट्या प्रमाणात ताण येत आहे. सर्व कर्मचारी यामुळे त्रस्त आहेत. मात्र, कोणीही कामचुकारपणा करत नाही. प्रत्येक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. अभिमन्यू काशिद, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी (प्रभारी)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.