आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना भाजपकडून खाल्लेल्या खोक्याची मस्ती चढली आहे, अशा शब्दांत जिल्ह्यातील सर्वपक्षीय महिला नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात केलेल्या अवमानकारक विधानावर सत्तार यांचा समाचार घेतला. सर्वच महिला नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुळे यांच्याविषयी अवमानकारक विधान केले आहे. यामुळे राज्यात त्यांच्याविराेधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येत आहे.
याचे पडसाद जिल्ह्यातही उमटले असून येथेही आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सत्तार यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. मंत्री असून त्यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याबाबत तीव्र आक्षेप घेत या प्रकाराचा निषेध केला आहे. तसेच अब्दुल सत्तार यांच्या राजिनाम्याचीही मागणी करण्यात आली आहे. काहींच्या वतीने मुख्यमंत्र्यांनीच अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात फिरू देणार नाही अब्दुल सत्तार यांना भाजपकडून खाल्लेल्या खोक्याची मस्ती चढल्याने ते बेताल बोलताहेत. त्यांना पैशाच्या माजापुढे महिलांचा आपल्याकडून अवमान होत असल्याचेही कळेनासे झाले आहे. त्यांची मस्ती जिरवण्यासाठी काही वेळ लागणार नाही. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाेबत महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेची माफी मागावी. अन्यथा त्यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्या महाराष्ट्रात कोठेही फिरू देणार नाहीत. सक्षणा सलगर, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस.
सूर्यावर थुंकण्याचा प्रकार कर्तव्यशून्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. हा माणूसच मुळात वाचाळ आहे. मंत्री म्हणून त्यांचे कर्तुत्व काय आहे ? आपले अपयश झाकण्यासाठी ते कोठेही काहीही बरळत असतात. त्यांना इतके महत्त्व देण्याची गरजच काय? त्यांना सुप्रियाच नव्हे तर कोणत्याही महिलेबद्दल अशा अशालीन भाषेत बोलण्याचा हक्क नाही. डॉ. स्मिता शहापूरकर, प्रदेश सदस्या, महिला काँग्रेस.
हा माणूस तर कोठेही बरळतोय हा माणूस तर कोठेही बरळतच आहे. शिशूपालाचे शंभर अपराध भरल्यानंतर श्रीकृष्णाने त्याला शिक्षा केली. तसाच प्रकार त्यांच्यासोबत होतोय. सत्तारांचे १०० अपराध भरल्यानंतर जनताच त्यांना शिक्षा देईल. महाराष्ट्राची परंपरा महिलांचा सन्मान करण्याची असताना महाराष्ट्राचा मंत्रीच तारतम्य सोडत असेल तर मुख्यमंत्र्यांनी आता दखल घेण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. शामल वडणे, जिल्हाप्रमुख, महिला आघाडी, उद्धव ठाकरे गट
ही तर निषेध करण्यासारखीच बाब एखाद्या जबाबदार मंत्र्याने एका खासदारांविषयी असे विधान करणे ही निषेध करण्यासारखीच बाब आहे. त्यांना हा प्रकार शोभत नाही. पक्ष कोणताही असो महिलांविषयी केलेले हे वक्तव्य निंदणीयच आहे. मंत्री म्हणून काम करत असताना त्यांना हा प्रकार शोभणारा नाही. कोणत्याही महिलेसंदर्भात असे अपशब्द वापरणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही. अब्दुल सत्तार यांनी यापुढे भान ठेवून बोलावे. नंदाताई पुनगुडे, भाजप पदाधिकारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.