आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आष्टा जहागीर येथे अखंड हरिनाम सप्ताह व पारायण

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत महात्म्यांनी जगावर मोठे उपकार केले आहेत. वैष्णवाचे शिरोमणी संत नामदेवराय असून या सांप्रदायाला भेदाभेद अमान्य आहे. चंद्रभागासारखे तीर्थ नाही, पांडुरंगा सारखे दैवत नाही, ज्ञानोबा व तुकोबांसारखे संत नाहीत. महाराष्ट्रामध्ये देव विठ्ठल परमात्मा नांदतो आहे हे सर्वांचे भाग्यच आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सुध्दा हरिनामाची पताका संतसेना महाराजांनी मध्य प्रदेशापर्यंत नेल्याचे प्रतिपादन हभप शिवशाहीर गीतांजली झेंडे दिवेघाट यांनी कीर्तनसेवेत केले.

तालुक्यातील आष्टा जहागीर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, शतचंडी यज्ञ सोहळ्याचे पाचवे पुष्प सादर करताना शनिवारी (३) रात्री कीर्तनसेवेत उदार तुम्ही संत मायबाप या अभंगाचे विवेचनात बोलत होत्या. यावेळी दामोदर मठाचे मठाधिपती महंत अवधूतपूरी महाराज, सरपंच सतिश जमादार, उपसरपंच बापूराव गायकवाड, मोहनराव गायकवाड,माजी सरपंच राधाताई गायकवाड, तंटामुक्त अध्यक्ष संजय मोरे, वकील सुशीलकुमार शिंदे, शालेय ग्राम शिक्षण समितीचे सभापती तुकाराम गायकवाड, श्रीपाद कुलकर्णी, दयानंद सुर्यवंशी, ज्ञानेश्वर येवते,श्रीहरी माने, दाजीबा माने, राम माने आदींची उपस्थिती होती.

धर्माचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी सदैव तत्पर राहिले पाहिजे. मोघलशाहीच्या पारतंत्र्यातून बाहेर पाडण्यासाठी माँसाहेब जिजाऊ समर्थ होती म्हणुन आज बहुजन सुखाने नांदत आहेत.

महाराष्ट्र शिवबांच्या येण्याने पारतंत्र्यातून सुटका झाली आणि स्वराज्याची भगवी पताका फडकू लागली असे सांगून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे महत्व सांगितले. यावेळी आष्टा गावासह पंचक्रोशीतील भक्तभाविक उपस्थित होते.महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा आहे. याच्या साहित्याने अनेकजण तरले. त्यांच्या अभंगाने माणसाची मने अभंग राहिली, हे आपल्या भूमीचे वैशिष्ठय आहे. ते आपण जपले पाहिजे, अशी शिकवण या कीर्तनातून यावेळी मिळाली.

बातम्या आणखी आहेत...