आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील अंगणवाडी (क्रं. ८०४) मागील अकरा वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याने बंद होती. यामुळे चिमुकल्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी पाहिल्याच ग्रामसभेत धाडसी निर्णय घेऊन अंगणवाडी अतिक्रमणमुक्त केली. यामुळे चिमुकल्यांचा ज्ञानार्जनाचा प्रश्न सुटला आहे. २००८ मध्ये जिल्हा परिषदेच्या योजनेंतर्गत पांगरदरवाडी येथे नवीन इमारत उभारली होती. या अंगणवाडीत चिमुकल्यांनी सलग दोन वर्षे ज्ञानार्जन केले होते. मात्र, काही तांत्रिक त्रुटींमुळे ही अंगणवाडी बंद पडली होती. मागील ११ वर्षांपासून या अंगणवाडीला पर्यायी व्यवस्था म्हणून तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी भाड्याच्या खोलीत अंगणवाडी सुरू केली होती.
अंगणवाडी बंद असल्याबाबत अनेकदा वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, प्रश्न कायम होता. शुक्रवारी (दि.३) ग्रामंपचायतीची पहिलीच ग्रामसभा होती. यात अंगणवाडीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. उपसरपंच सोमनाथ शिंदे यांनी अतिक्रमणधारकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यातून सुवर्णमध्य काढत अंगणवाडी भोवती झालेले अतिक्रमण काढले. यामुळे ११ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न काही तासातच सोडवला गेला. बाॅन्ड गहाळ झाल्याने झाला होता वाद अंगणवाडीचे बांधकाम करण्यापूर्वी तत्कालीन ग्रापं. पदाधिकाऱ्यांनी १०० रुपयांच्या बाॅन्डवर मूळ मालकाकडून जागा घेतली होती. याची ग्रामपंचायत दफ्तरी नोंदही आहे. मात्र, तो बाॅन्ड गहाळ झाल्याने तत्कालीन पदाधिकारी व जागा मालकात वाद होऊन ही अंगणवाडी बंद पडली होती. नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य व तरुणांनी जागा मालकाची समजूत काढून अंगणवाडी अतिक्रमणमुक्त केली.
सीईओ गुप्ता यांच्याकडूनही अभिनंदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता सहा महिन्यांपूर्वी गावात आले होते. त्यावेळी काही ग्रामस्थांनी त्यांच्या कानावर हा प्रश्न घातला होता. त्यांनी तुळजापूरचे गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करुन अहवाल देण्याच्या सूचना केल्या होत्या. सहायक गटविकास अधिकारी राऊत यांनी घटनास्थळी जाऊन अहवाल तयार केला होता. त्यापूर्वीच नूतन ग्रापं. पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न सोडवल्याने सीईओ राहुल गुप्ता यांनीही अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.