आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआताच बदलून आलोय, ४ हजार फाइल्स पेंडिंग आहेत. प्रत्येक फाइल पाहावी लागेल. किमान ६ महिने जातील. तुमच्या फाइलचा नंतर विचार करू, हे उत्तर आहे पंजाब बँकेच्या मॅनेजरचे. तर, माझी बदली झालीय, येणाऱ्या नवीन मॅनेजरला भेटा, मी कर्ज प्रकरण करू शकत नाही, असा सल्ला दिला महाराष्ट्र बँकेच्या मॅनेजरने. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत कर्जासाठी फिरणाऱ्या बेरोजगार तरुणांना बँकांकडून टाळण्याचे कसे प्रकार होतात, हे ‘दिव्य मराठी’ने स्टिंगमधून समोर आणले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील २९ मार्चला धाराशिव दौऱ्यावर आले असता बहुतांश बँकांनी आमच्याकडे कर्जासाठी प्रस्तावच येत नाहीत, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने खरोखरच बँका सहकार्य करतात का, हे जाणून घेण्यासाठी प्रस्ताव तयार असलेल्या ५ कर्जदार तरुणांना सोबत घेऊन धाराशिव शहरातील वेगवेगळ्या ८ राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांमध्ये जाऊन सोमवारी (८ मे) पडताळणी केली. ६ बँकांनी कर्जासाठी टाळाटाळ केली तर आयडीबीआय व सेंट्रल बँक ऑफ इंडिया या २ बँकांनी कर्जासाठी तयारी दर्शवली.
बँक ऑफ महाराष्ट्र
तरुण : माझे खाते आपल्या बँकेत आहे, कर्ज हवे होते.
मॅनेजर : माझी बदली झाली आहे. नवे मॅनेजर येतील. ते आल्यावर तुम्ही त्यांना भेटा. मी काही करू शकत नाही.
आयसीआयसीआय बँक
तरुण : मी येवतीचा आहे, दुकान शहरात आहे, महामंडळामार्फत कर्ज होईल का?
मॅनेजर : हो, किती हवे? दहा लाख का? ठीक, तुमची फाइल घेऊन या उद्या.
आयडीबीअाय बँक तरुण : ऑटोमोबाइल दुकानासाठी महामंडळाकडून कर्ज हवे होते, ही फाइल (दाखवत) आहे. मॅनेजर: खाते कोणत्या बँकेत आहे? तरुण : महाराष्ट्र बँकेत आहे. मॅनेजर : मग आमच्याकडे कर्ज होऊ शकत नाही. खाते काढल्यानंतर किमान वर्षभर व्यवहार बघून आम्ही कर्ज प्रकरण करतो. सध्या तुम्ही महाराष्ट्र बँकेतूनच कर्ज घ्या.
अॅक्सिस बँक
तरुण : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मला गायींच्या प्रकल्पासाठी कर्जाची आवश्यकता आहे.
मॅनेजर : लातूरच्या ब्रँचमध्ये आर्थिक घोटाळा झाल्यामुळे आम्हाला कर्ज प्रकरणे करू नका, अशा सूचना आहेत. त्यामुळे कर्ज प्रकरण करता येत नाही. दोन-तीन महिन्यांनंतर पाहू.
इंडियन बँक (पूर्वीची अलाहाबाद)
तरुण : अण्णासाहेब पाटील महामंडळाअंतर्गत कर्ज प्रकरणासाठी आलोय, मॅनेजर नाहीत का?
कर्मचारी : मॅनेजर साहेब नाहीत, उद्या या.
पंजाब नॅशनल बँक
तरुण : अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून ऑटोमोबाइल दुकानासाठी फाइल करायची आहे, काय लागेल?
मॅनेजर : मी आताच पदभार घेतलाय, बदलून आलोय. माझ्याकडे आधीच्या ४ हजार फायली पेंिडंग आहेत. त्या फायली झाल्यानंतर बघू. त्यासाठी किमान ६ महिने लागतील. आताच काही सांगू शकत नाही.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एसबीआय (पूर्वीची हैदराबाद बँक) अशीच उत्तरे.
कर्ज प्रकरणांचा एकूण प्रवास
- 2849 प्रकरणे मंजूर, योजना सुरू झाल्यापासून
- 189 कोटींचे आतापर्यंतचे जिल्ह्यातील कर्ज वाटप
- 19 कोटी कर्ज प्रकरणांतून मिळालेला व्याज परतावा
- 125 सध्याची प्रलंबित कर्ज प्रकरणे
- 1000 कर्ज प्रकरणांचे दरवर्षीचे उद्दिष्ट
महाराष्ट्र बँकेत जाऊन आलो. मात्र बेदखल केले. दुसऱ्या बँकेत गेल्यास तुमचे ज्या बँकेत खाते आहे तेथेच जा, असे म्हटले. - बाबासाहेब साळंुके, व्यावसायिक, धाराशिव.
‘त्या’ बँकांना बघून घेऊ
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ज्या बँकांना कर्ज द्यायचे नाही त्या काहीही कारणे देतात. आढाव्यात ही बाब समोर येईल, तेव्हा बघून घेऊ. आता महामंडळ व बँक ऑफ इंडियात करार झाला, गावपातळीपर्यंत त्याचा फायदा होईल.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांसमोर बँकांचे अधिकारी म्हणाले होते, आमच्याकडे कर्जदारच येत नाहीत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.