आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फज्जा:शालेय पोषण आहार वाटपाची घोषणा कोरडीच, तांदूळच नाही, वाटप कसे ?

ईट2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • तांदुळ आलेच नसल्याने विद्यार्थ्यांना आहार द्यायचा कसा, शिक्षकांना पडला प्रश्न

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने शाळेत शिजवून मिळणारा शालेय पोषण आहार हा बंद करण्यात आला होता. त्याऐवजी या काळात शासनाकङून कोरडा तांदूळ, डाळ (शिधा) विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. मात्र आता शाळा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू झाल्या आहेत. त्यामुळे १५ मार्चपासून पूर्वीप्रमाणे शाळेतच पोषण आहार शिजवून देण्याबाबत शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत. मात्र शाळेत शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी तांदूळ व इतर साहित्यच आलेले नाही. त्यामुळे पोषण आहार शिजवणार कसा व विद्यार्थ्यांना वाटप होणार कसे, असा यक्षप्रश्न ईटसह परिसरातील शाळांमधील शिक्षकांना पडला आहे.

शासनाकडून घोषणा होऊन पाच दिवस होवून गेले. मात्र शाळांमध्ये पोषण आहाराचे साहित्य आले नाही. त्यामुळे सध्यातरी ही घोषणा कोरडीच असल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून पहिली ते आठवीच्या जिल्हा परिषद, खासगी संस्था आदी शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. मात्र, कोरोनाच्या पहिल्या लाटेत २०२० मध्ये शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या काळात विद्यार्थ्यांना शिधा वाटप करण्यात आला. यात तांदुळ, डाळ व कडधान्याचा समावेश होता.

२६ शाळांतील २८२७ विद्यार्थ्यांना पोषण आहार
ईट व परिसरातील २६ शाळांमधील दोन हजार ८२७ विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो. पखरूड, लांजेश्वर, निपाणी, आंद्रुड, ज्योतीबाचीवाडी, डोकेवाडी, गिरवली, घाटनांदुर, चांदवड आदी शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गेल्या काही महिन्याचा फेब्रुवारी २०२२ पर्यतचा शालेय पोषण आहार हा वाटप करण्यात आला. हा आहार वाटप केल्यानंतर शासनाकडून १५ मार्चपासून पोषण आहार हा पूर्वीप्रमाणे शाळेत शिजवून देण्याचे आदेश मागील आठवड्यात देण्यात आले. ते शाळा स्तरावर आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आता ओसरला आहे. त्यामुळे शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. मात्र ईटसह परिसरातील सर्व शाळांना आदेश प्राप्त होवूनही तांदुळ व डाळ आली नसल्याने पोषण आहार शिजवायचा कसा, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

तांदूळ नसल्यास बाहेरून आणून आहार वाटप
जिल्ह्यातील शाळांना पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार ज्या शाळांकडे तांदुळ आहेत, त्यांनी शिजवून पोषण आहार द्यावा, अन्यथा बाहेरुन आणून पोषण आहार वाटप करावा. - ज्ञानेश्वर मोरे, शिक्षणाधिकारी (प्रा.), उस्मानाबाद.
मात्र शाळेत शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी तांदूळ व इतर साहित्यच आलेले नाही. त्यामुळे पोषण आहार शिजवणार कसा व विद्यार्थ्यांना वाटप होणार कसे, असा यक्षप्रश्न ईटसह परिसरातील शाळांमधील शिक्षकांना पडला आहे.

बातम्या आणखी आहेत...