आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:थकीत मजुरीसाठी पालिकेसमोर ठिय्या‎

धाराशिव‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिन्यांपासून मजुरी थकल्याने‎ मजुरांच्या कुटुंबांना‎ उदरनिर्वाहासाठी अडचण येत‎ आहे. तसेच कचरा वाहून नेणाऱ्या‎ गाडीचे पेमेंट होत नसल्याने‎ गाड्यांचे हप्ते थकले आहेत.‎ पालिकेने मजुरांची थकीत मजुरी‎ देऊन गाड्यांचे पेमेंट करावे, या‎ मागणीसाठी स्वच्छता कामगारांनी‎ गुरुवारी (दि.३) धाराशिव‎ नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन‎ केले. दरम्यान, पालिका व‎ ठेकेदाराने आश्वासन दिल्यानंतर‎ आंदोलन मागे घेण्यात आले.

‎धाराशिव शहराची पहाटेपासून‎ स्वच्छता करण्यासाठी‎ नगरपालिकेकडे जवळपास ३००‎ पेक्षा अधिक मजूर आहेत. त्या‎ मजुरांमार्फत शहरातील रस्त्यांची‎ सफाई केली जात असून गल्लीतील‎ कचरा गोळा केला जातो. या‎ मजुरांमध्ये अनेक कुटुंबातील‎ पती-पत्नी व मुलेही कामाला‎ आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार‎ मागील दोन महिन्यांपासून थकीत‎ आहे. तसेच शहरातील प्रत्येक‎ वॉर्डातून कचरा गोळा करण्यासाठी‎ १५ पेक्षा अधिक खासगी वाहने आहेत.‎ त्यांचेही पेमेंट वेळेवर होत नाही.‎ यामुळे वाहनधारकांचे हप्ते थकले‎ असून बँकांकडून तगादा लावला‎ जात आहे.

यामुळे गुरुवारी मजूर व‎ वाहनधारकांनी नगरपालिकेसमोर‎ ठिय्या आंदोलन केले. पालिकेला‎ कामगारांची मजुरी देणे होत नसेल‎ तर आमचे पैसे देऊन बंद करावे.‎ काम करून घेतले जाते मात्र वेळेवर‎ मजुरी दिली जात नसल्याने‎ कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त होत‎ होता. काही मजुरांच्या‎ औषध-गोळ्यांसाठी पैसे नसल्याने‎ त्रास सहन करावा लागत आहे.‎ घरात अन्न खायला नसल्याने‎ मजुरांनी ठिय्या आंदोलन केले.‎ अनेक मजुरांना व्याजाने पैसे घेऊन‎ कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत‎ असल्याचे सांगितले. दरम्यान,‎ ठेकेदार व पालिकेच्या‎ अधिकाऱ्यांनी मजुरीबाबत‎ आश्वासन दिल्यानंतर मजुरांनी‎ आंदोलन मागे घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...