आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय महाविद्यालयात आनंदोत्सव:वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली, प्रवेशाच्या तयारीला लागा; मोफत मिळतील तातडीच्या आरोग्य सुविधा, बाजारपेठेला मिळणार बळ

चंद्रसेन देशमुख | उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुपारी १ ची वेळ. एनएमसी अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने र्व्हच्युअल मीटिंग बोलावली.यादरम्यान आयोगाने तीन व्यक्तींना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नियोजित महाविद्यालयाच्या परिसरात मोबाईलद्वारे छायाचित्रण करण्यास सांगितले आणि अध्ययन कक्ष, रूग्णालयातील सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी महत्वाच्या नोंदी घेत ऑनलाईन पध्दतीने अवलोकन केले. पुन्हा एकदा सुविधांची पडताळणी सुरू झाल्याने महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांची धाकधूक वाढलेली. आयोगाने अचानक महाविद्यालयाच्या टीमचे अभिनंदन केले आणि तुमच्या मेडीकल कॉलेजला मंजूरी देत आहोत, प्रवेश प्रक्रियेच्या तयारीला लागा,अशा सूचना दिल्या.त्यानंतर अभूतपूर्व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

कोणत्याही तातडीच्या उपचारासाठी सोलापूरला रेफर करावे लागत असल्यामुळे रूग्णांचे प्रवासातच दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. वैद्यकीय सुविधांअभावी जिल्ह्यातील रूग्णांची वर्षानुवर्षे परवड सुरू आहे. तातडीच्या आरोग्यसुविधा नसल्याचा जिल्ह्याला सर्वाधिक फटका कोरोना काळात बसला.सोलापूर, लातूर,पुणे, मंुबई, बार्शी, अशा विविध ठिकाणी रूग्णांना उपचारासाठी जावे लागले. बार्शी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी तर आमच्या तालुक्यात बाहेरच्या रूग्णांना दाखल केले जाणार नाही, अशी थेट भूमिका घेतली होती. जिल्ह्यात तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध असाव्यात,तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता व्हावी, यासाठीची आग्रही मागणी केली जात होती. यावर उपाय म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी पुढे येत होती.

वर्षानुवर्षे ही मागणी असली तरी त्यासाठी अपेक्षित बळ मिळत नव्हते. महायुतीच्या काळात तत्कालिन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली. पुढे हीच घोषणा महाविकास आघाडीतील मंत्री अमित देशमुखांनी केली. यादरम्यान शासन निर्णयही निघाला. मात्र, ४ फेब्रुवारीला (२०२२) एनएमसीची पाहणी झाली त्यात वैद्यकीय महाविद्यालयातील असुविधांमुळे महाविद्यालयाला मंजूरी नाकारण्यात आल्याचे जाहीर झाले.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तातडीने वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून आरोग्य सचिवांसोबत महाविद्यालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.यावर्षीही प्रवेश प्रक्रिया टळू नये,यासाठी फेरअहवाल तयार करण्याच्या सूचना महाविद्यालयाच्या टीमला दिल्या. त्यानंतर नव्याने रितसर प्रक्रिया करण्यात आली. महाविद्यालयाच्या टीमने एनएमसीकडे अर्जासह आवश्यक कागदपत्रे सादर केली.

त्यानंतर गेल्या आठवड्यात टीमने भेट देऊन पाहणी केली. गुरूवारी पुन्हा एकदा ऑनलाईन पध्दतीने पाहणी करून महाविद्यालयाला मंजूरी देत असल्याचे जाहीर केले. मंजूरीनंतर अपेक्षेप्रमाणे श्रेयाची राजकीय स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र,सामान्य उस्मानाबादकरांना वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याचे समाधान आहे. यामुळे सामान्य रूग्णांना चांगल्या आणि महत्वाच्या आरोग्य सुविधा जिल्ह्यातच मिळणार आहेत.

यामुळे मिळाली वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी
काही महिन्यांपूर्वीच जिल्हा शासकीय रूग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरीत करण्यात आले असून, त्यामुळे ३३० बेडचे रूग्णालय उपलब्ध झाले आहे.सद्यस्थितीत रूग्णालयात सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय महाविद्यालयासाठी लागणारे मनुष्यबळ अर्थात प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसरसह विविध २०० पदांवरील अधिकारी-कर्मचारी रूजू झाले आहेत.

काही अधिकारी लातूर, अंबाजोगाई आदी भागातून डेप्युटेशनवर रूजू झाले आहेत.त्यामुळे समितीसमोर १० टक्क्यांपेक्षा अधिक अनुपस्थिती दिसून आली नाही. तसेच डॉक्टरांचे डॉक्युमेंट परिपूर्ण असल्यामुळे अडचणी उरल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांसाठी अध्ययन कक्ष, त्यात स्क्रीन, ई-लायब्ररी, प्रयोगशाळा आदी सामग्री उपलब्ध होती. महत्वाचे म्हणजे महाविद्यालयासाठी सव्वातीन कोटींची भव्य इमारत रूग्णालयाकडून मिळाल्याने ही जमेची बाजू ठरली आहे.

सुविधांची उपलब्धता, त्रुटी नाहीत
शासन निर्णय झाल्यावरही मेडिकल कॉलवेजला एनएमसी या केंद्रीय आयोगाची मंजूरी अत्यावश्यक असते. आयोगाकडून अनेक पातळ्यांवर तपासणी केली जाते. त्रुटी आढळल्यास मंजूरी नाकारली जाते. ही समिती महाविद्यालयाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करते.उस्मानाबादच्या पाहणीत त्रुटी आढळल्या नाहीत,त्यामुळे मंजूरी मिळू शकली.

बातम्या आणखी आहेत...