आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत:तेरखेड्यात किराणा व्यापाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा; 10 लाखांचा ऐवज लुटला

वाशी9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी व्यावसायिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकत तब्बल ९ लाख ९५ हजारांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे एका व्यापाऱ्याच्या भावजयीला चार जण गेटमधून येत असल्याचे दिसल्याने त्यांनी दिराला आवाज दिला. दिराने पाहुणे समजून दार उघडल्याने दराेडेखाेरांचे काम आणखीच साेपे झाले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या पोलिस अधीक्षकांना संतप्त ग्रामस्थांनी सतत घडत असलेल्या चाेरी व दराेड्यांच्या घटनांबद्दल जाब विचारत नाराजी व्यक्त केली.

तेरखेडा येथील कापड व किराणा दुकानदार शंकर मुरलीधर वराळे (६५) हे पत्नी, सून, भावजई व दोन नातवंडे यांच्यासह राहतात. बुधवारी त्यांची सून व दोन्ही नातवंडे गावाला गेले होते. यामुळे घरामध्ये शंकर वराळे, त्यांची पत्नी पार्वतीबाई व भावजई विमल असे तिघेच होते. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास वराळे यांच्या भावजई विमल यांना जाग आली. या वेळी त्यांनी बाहेरील गेटमधून कोणीतरी आत येत असल्याचे दिसल्याने त्यांनी शंकर वराळे यांना आवाज दिला. वराळे यांनी दरवाजा उघडला असता समोरून आलेल्या अज्ञात चार दरोडेखोरांनी चाकू, लोखंडी सळई, कोयता आदीचा धाक दाखवत घरात प्रवेश केला. त्यानंतर महिलांच्या अंगावरील व कपाटातील, सोन्याचे गंठण, मोहन माळ, लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील सोन्याचे कडे, बोरमाळ असे ४ लाख ६२ हजार किंमतीचे दागिने, रोख ४ लाख ७० हजार रुपये व इतर साहित्य असा एकूण ९ लाख ९५ हजारांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. यानंतर चोरट्यांनी आणखी एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. परंतु, घरातील व्यक्ती जागे झाल्याने त्यांनी तेथून पळ काढला. प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तेरखेडा व परिसरामध्ये सातत्याने चोऱ्यांचे प्रकार घडत असून त्याचा तपासही लागत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलिस ठाण्याचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच श्वान पथक, ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे.

नागरिकांनी एसपींना विचारला जाब
वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे तेरखेडा ग्रामस्थ संतप्त आहेत. तेरखेडा येथील फर्निचर, फटाके यांच्यासह अनेक उद्योगांचा जिल्ह्यासह महाराष्ट्रात नावलौकिक आहे. तेरखेडा व परिसरातील गावामध्ये मागील काही महिन्यांपासून चोऱ्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या घटनांचा तपासही लागत नसल्याने पोलिसांच्या कारवाईवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, दरोड्याच्या घटनेनंतर भेट देण्यासाठी आलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांना नागरिकांकडून या घटना रोखता येऊ शकत नाहीत का? झालेल्या घटनांचा तपास अद्याप का लागत नाही, असे प्रश्न विचारून येरमाळा पोलिसांबद्दलही नाराजी व्यक्त केली. यावेळी रोशन यांनी घडलेल्या सर्व घटनांतील आरोपी एकच आहेत की वेगवेगळे या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगत लवकरच आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...