आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून सोमवारी व मंगळवारी जिल्ह्यातील काही भागात भुरभुर स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाचा ज्वारीसह हरभऱ्यावर परिणाम होणार असून ज्वारीवर लष्कर अळी तर हरभऱ्यावर घाट अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रजनन सापळे, पक्षी थांबे व निंबोळी अर्काची फवारणी करावी, असे आवाहन कृषी हवामान शास्त्रज्ञांच्या वतीने केली आहे.
जिल्ह्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा चांगला कडाका निर्माण झाला होता. मात्र, ११ डिसेंबरपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. उस्मानाबाद, ढोकी, कळंब, शिराढोण यासह इतर भागात भुरभुर स्वरूपाचा पाऊस झाला. भुरभुर ऐवजी चांगला पाऊस झाल्यास ज्वारीसह हरभऱ्याच्या पिकाला फायदा होऊ शकतो. मात्र, भुरभुर पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात पुन्हा तूट निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रथमच अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा खरिपातील उत्पादन खर्चही निघाला नाही. त्या शेतकऱ्यांनी उसनवारी करून रब्बी हंगामाची पेरणी केली असून खरिपातील तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मात्र, अचानक वातावरणात बदल झाल्याने रब्बी हंगाम पुन्हा संकटात आल्याचे दिसत आहे. सध्या घोंगावत असलेले ढगाळ वातावरण अधिक काळ राहिल्यास शेतकऱ्यांचे निम्म्यापेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्वारी व हरभऱ्याचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी तुळजापूर कृषी महाविद्यालयाचे हवामान शास्त्रज्ञ नकुल हारवाडीकर यांनी सूचवलेल्या उपाययोजना करण्याची गरज आहे. यामध्ये ज्वारीवरील लष्कर अळी व हरभऱ्यावरील घाट अळी कमी करण्यासाठी अळीचे प्रजनन बंद करण्यासाठी प्रजनन सापळे लावणे, अळीचा भक्ष करण्यासाठी पक्षी थांबे तयार करणे, तसेच निंबोळी अर्काचा वापर करून फवारणी करण्याची गरज आहे. यामुळे रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल. तसेच उत्पन्नातील तूट कमी करण्यास मदत होईल.
तूर शेंगा भरण्याच्या स्थितीत अळ्यांमुळे बसणार फटका खरीप व रब्बीत लागवड झालेले तुरीचे पीक शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. काही भागात शेंगा भरणी झाली आहे तर काही भागात शेंगा भरत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत चार दिवसांपासून ढगाळ वातावरण घोंगावत असल्याने तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी करून अळीचा प्रादुर्भाव रोखण्याची गरज आहे.
काही दिवस ढगाळ वातावरण, निंबोळी अर्काची फवारणी करा ^ जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण घोंगावत आहे. मधूनच पावसाची भुरभुरही येत आहे. याचा रब्बी हंगामातील सर्वच पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी प्रजनन सापडे, पक्षी थांबे करून अळ्यांचा प्रादुर्भाव कमी करावा. एवढे करूनही अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्यास निंबोळी अर्काची फवारणी करावी.'' नकुल हारवाडीकर, कृषी हवामान शास्त्रज्ञ.
बटाट्याच्या पिकावरही करपा रोगाचा प्रादुर्भाव चार दिवसांपासून आभाळाचे घोंगण असल्यामुळे ज्वारीवर पांढरे किडे, लष्कर अळी तर हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच बटाट्याच्या पिकावर करपा रोग पडला आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनामध्ये जवळपास ४० टक्के घट होण्याची शक्यता आहे. परंतु शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी केली तरीही पिकांचे काही प्रमाणात नुकसान होणे अटळ आहे.'' -प्रविण जगताप, सातेफळ, ता. कळंब.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.