आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या ढोकी ग्रामपंचायतसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या समुद्रे गटाने घवघवीत यश संपादन करत सरपंचपदासह बारा जागा पटकावत बहुमताने तिसऱ्यांदा ग्रामपंचायती सत्ता हस्तगत केली.त्यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या भाजप प्रणित पॅनेलला अवघ्या पाच जागावर समाधान मानावे लागले तर ढोकी विकास आघाडीला व बाळासाहेबांची शिवसेना प्रणित तानाजी सावंत ग्राम विकास आघाडी,मनसे,आपला खातेही उघडता आले नाही.
कै.किसनतात्या बहुजन ग्रामविकास आघाडीकडून सरपंच पदासाठी अश्विनी प्रशांत माळी, ढोकी ग्रामविकास आघाडीकडून उषा अमर माळी, भाजपा प्रणित राणा जगजितसिंह पाटील बहुजन ग्रामविकास आघाडीकडून माजी जिल्हा परिषद सदस्या मीना श्रीहरी माळी व मंत्री तानाजी सावंत प्रणित ग्राम विकास आघाडीकडून पूजा अच्युत डोलारे असा चौरंगी मुकाबला झाला होता.यामध्ये काँग्रेस प्रणित समुद्रे गटाच्या अश्विनी प्रशांत माळी यांनी ३७८८ मते घेत ढोकी विकास आघाडीच्या उषा अमर माळी यांचा १९३१ मतांनी पराभव केला. भाजपा प्रणित पॅनलच्या उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्या मीना श्रीहरी माळी यांना अवघ्या १५२६ मतांवर समाधान मानावे लागले.
माजी सरपंच गुणवंत देशमुख, माजी सरपंच व मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष गफार काझी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव ठाकरे गट,राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मिळून ढोकी विकास आघाडी करण्यात आली होती. या आघाडीने अनेक दिग्गज मैदानात उतरले होते.परंतू त्यांचा पत्ता चाललाच नाही सर्वच उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली.
जेसीबीवरून गुलाल उधळला.
काँग्रेसचे नेते कै.नारायण समुद्रे यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या ढोकी ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचे पुतणे अमोल समुद्रे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस प्रणित कै. किसन तात्या समुद्रे बहुजन ग्राम विकास पॅनलने चमकदार कामगिरी करत सरपंचपदासह बारा जागा पटकावत ग्रामपंचायतीची तिसऱ्यांदा सत्ता कायम राखली.
अमोल समुद्रे व विजयी उमेदवार यांचे ढोकी येथे आगमन होताच कै.किसन तात्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन विजय मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जेसीबी वर गुलाल उधळत समुद्रे समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला.
विजयी उमेदवार
काॅंग्रेस प्रणित कै. किसन तात्या समुद्रे बहुजन ग्राम विकास आघाडीकडून प्रभाग क्रमांक एक मधून शोभा नारायण समुद्रे,प्रकाश ढवारे, हकीम कुरेशी.प्रभाग क्रमांक दोन मधून राहुल देशमुख, श्रीकांत परिट, आशियाबेगम शकील काझी.
प्रभाग क्रमांक तीन मधून नहुषराज समुद्रे, रेखा रवींद्र कसबे, तोळाबाई नाना चव्हाण.प्रभाग क्रमांक चार मधून पॅनल प्रमुख अमोल समुद्रे, शहनाज जुबेर पठाण, राजश्री सोमेश्वर सूर्यवंशी तर भाजपा प्रणित राणा जगजितसिंह पाटील ग्राम विकास आघाडी कडून प्रभाग क्रमांक पाच मधून रेश्मा निहाल काझी, संजू पवार व प्रभाग क्रमांक सहा मधून परवेज काझी, छाया संजय घनघावे,विमल मुकिंद डोलारे या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.दरम्यान जिल्हयातील सर्वच ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आ.राणा पाटलांनी जोर लावूनही भाजपाला अपयश
ढोकी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप प्रणित पॅनलने आ. राणा जगजितसिंह पाटील यांची प्रचार सभा घेऊन मोठा जोर लावला होता. यावेळी आ.पाटील यांनी बहुमताने ग्रामपंचायत ताब्यात देण्याचे आवाहन करूनही त्यांच्या पदरी निराशा पडली. गेल्या निवडणुकीत सहा जागा मिळवणाऱ्या पक्षाला एक जागेचा घाटा होऊन पाच जागांवर समाधान मानावे लागले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.