आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राऊंड रिपोर्ट:सिव्हिल परिसरातील तंबूच्या वॉर्डात कोविड लसीकरणासह आयुष ओपीडी, फिजिओथेरपी सुरू; रुग्णांतून समाधान, डब्ल्यूएचओकडून सुविधेची पाहणी

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेल्या टेंटमध्ये जिल्हा रुग्णालयाने कोविड लसीकरण केंद्रासह आयुष ओपीडी, फिजिओथेरपी, मसाज सेंटर सुरू केले आहे. यामुळे अनेक वर्षांपासून अपुऱ्या जागेत सुरू असलेल्या फिजिओथेरपी व आयुष विभागाने मोकळा श्वास घेतला आहे. रुग्ण व नातेवाईकांना बसण्यासाठी व्यवस्था झाली आहे. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या दोन्ही इमारतींच्या पाठीमागे असलेले कोविड लसीकरण केंद्रही टेंटमध्ये सुरू केले आहे. यामुळे नागरिकांची सोय झाली असून प्रतिसाद वाढला आहे. टेंटच्या वॉर्डात बेडसह अत्यावश्यक साहित्य व सुविधा उपलब्ध असल्याने कर्मचाऱ्यांसह रुग्णांतून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात १५ टेंट वॉर्डाचे काम पूर्ण झाले असून तेथे कोविड लसीकरणासह आयुष विभागाची ओपीडी व फिजिओथेरपी वॉर्ड सुरू केला आहे. आठ दिवसांत जवळपास ३०० वयोवृद्धांनी बुस्टर डोस घेतला आहे. तसेच अनेक रुग्णांनी फिजिओथेरपी, आयुष विभागात उपचार घेतले आहेत. टेंट वॉर्ड जिल्हा रुग्णालयाच्या समोरील इशान्य बाजूस असल्याने रुग्णालयाकडे जाताना सुरूवातीला टेंट वॉर्ड दिसतात. येथे कोविडचे लसीकरण सुरू केल्याने अनेक वयोवृध्दांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या नवीन व जुन्या इमारतीच्या पाठीमागे कोविड लसीकरण वॉर्ड होता. वॉर्ड शोधण्यासाठी नागरिकांना अर्धा ते एक तास लागत होता.

तसेच आयुष विभागाची ओपीडीही जुन्या कन्या शाळेच्या इमारतीत अपुऱ्या जागेत सुरू होती. फिजिओथेरपी विभागही जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे सुरू होता. अडगळीला असलेले विभाग शोधण्यासाठी रुग्णांसह नातेवाईकांचा गैरसोय होत होती. अत्यावश्यक तीनही विभाग टेंटमध्ये स्थलांतरित केले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांसह रुग्णांतून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्येला बेडची संख्या कमी पडली होती. अनेकांना जीव गमवावा लागला होता. याबाबतचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला मिळाल्यानंतर १०० बेडच्या टेंट (तंबू) रुग्णालयासाठी एक कोटीचा निधी दिला होता. त्यातून जिल्हा रुग्णालय परिसरात १५ तंबूचे वॉर्ड तयार केले. कोरोनाचे रुग्ण नसल्याने जिल्हा रुग्णालयाने या वॉर्डात आयुष ओपीडी, फिजिओथेरपी, लसीकरण वॉर्ड सुरू केला आहे. या १५ टेंट वॉर्डात प्रत्येकी ५ ते १० बेड असणार आहेत. गरजेनुसार त्यात बदल होईल. टेबल, खुर्ची, फर्निचर, लाइट, पाणी, रस्ता व शौचालयाची सुविधा केली. अधिक ऊन असूनही टेंटमध्ये गर्मी जाणवत नाही.

बातम्या आणखी आहेत...