आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बँकांनी कर्ज वाटप लक्ष्यांक पूर्ण करावे; उमरगा येथे आढावा बैठकीत आमदार चौगुले यांच्या सूचना

उमरगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठ्यासाठी शासनाने तालुकास्तरावर तालुका कर्ज वाटप समिती गठीत केली आहे. त्यानुसार शनिवारी (दि.२७) तहसील कार्यालयात खरीप हंगाम पीककर्ज वाटपासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कर्जवाटप समितीची बैठक घेण्यात आली. सर्वच बँकांचा शाखानिहाय कर्जवाटपाचा आढावा घेतला. बहुतांश बँकांनी लक्ष्यांकांपेक्षा कमी कर्जवाटप केल्याने संबंधीत शाखाधिकाऱ्यांना कर्जवाटप लक्ष्यांक पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांनी कर्जमाफी व शासकीय योजनांसंदर्भात मांडलेल्या समस्यांच्या अनुषंगाने संबंधीत शाखेला भेट देत चौकशी करण्याचे सहायक निबंधकांना सूचित केले. बँक अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुराव्याबाबत आश्वासित केले.

शेतकऱ्यांना जाचक अटी न लावता कमीत-कमी उपलब्ध कागदपत्रांनुसार कर्ज उपलब्ध करावे. कर्ज मंजुरीसाठी विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात येणारे प्रस्ताव दरमहा निकाली काढावेत, सर्वच बँकांनी कार्यक्षेत्रातील गावांत पीककर्ज वाटप मेळावे घ्यावेत. गटसमन्वयक, बँक प्रशासन व शेतकऱ्यांमध्ये समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना केल्या. बैठकीस नायब तहसीलदार शिवाजी कदम, सहायक निबंधक ए. आर. शहापूरकर, सहकार अधिकारी डिगंबर चिवडे, अरुण जगताप, शिवसेना उपतालुकाप्रमुख व्यंकट पाटील, विभागप्रमुख खय्युम चाकुरे, धोंडीराम पवार, बालक मदणे, अप्पासाहेब पाटील, स्वाभिमानी शेतकरी सेना अध्यक्ष रामेश्वर सूर्यवंशी, शरद इंगळे, मनोज जाधव, अमोल इंगळे, योगेश गायकवाड, शेतकरी व बँक अधिकारी उपस्थित होते.

नूतनीकरण करावे
कर्ज नूतनीकरणासाठी आणखी महिन्याची मुदत आहे. शेतकऱ्यांनी कर्ज नूतनीकरण करून घेतल्यास त्यांना व्याजात सवलत मिळेल. यासाठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी कर्ज नूतनीकरण करण्याचे आवाहन चौगुलेंनी केले.

बातम्या आणखी आहेत...