आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद:बीबीएफ यंत्र 1416, सोयाबीनचे क्षेत्र 3.76 लाख हेक्टर; तंत्रशुद्ध पेरणी होणार कशी?

खरीपाची तयारी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांपासून कधी अतिवृष्टी तर कधी पावसाच्या खंडामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होत आहे. यापासून बचावासाठी बीबीएफ यंत्राने पेरणीचे महत्त्व सध्या रुजत आहे. परंतु जिल्ह्यात केवळ १४१६ बीबीएफ यंत्र उपलब्ध आहेत. तुलनेने सोयाबीनचे क्षेत्र पावणेचार लाख हेक्टरच्या घरात असल्याने शेतकरी मनात असूनही या तंत्रज्ञानाचा वापर करू शकत नाही. आता कृषी विभागाच्या सर्व योजनांमधून अनुदान पुरवून अशा यंत्राची संख्या वाढवण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीक वरदान ठरत असल्यामुळे अनेकजण याकडे वळले आहेत. कमी वेळेत व खर्चात चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात पाच लाख २६ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी केली जाते. कृषी विभागाकडून तीन लाख ३६ हजार हेक्टवर सोयाबीनची पेरणी गृहित धरली जाते. परंतु, त्यापेक्षा अधिक पेरणी होत असते.

मागील ५ ते ७ वर्षांमध्ये कधी अतिवृष्टी तर कधी पावसाच्या खंडामुळे सोयाबीनला फटका बसत आहे. अतिवृष्टीत पाणी साठून तर पावसाच्या खंडामुळे कोमेजून सोयाबीन वाया जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यात रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी केल्यास फायदा होत असल्याचे दिसत आहे. विशेष करून मध्यम व हलक्या प्रतीच्या जमिनीत ही पद्धत फायदेशीर ठरल्याचे कृषी विभागातील अधिकारीही सांगतात.

यावर्षी ५२० यंत्रांचे वितरण
कृषी विभागाने गेल्या दोन वर्षात चांगले काम केल्यामुळे तसेच जिल्ह्याला केंद्र सरकारकडून तीन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे. यातून कृषी विभागाने ५२० यंत्रांसाठी अनुदान उपलब्ध केले आहे. यासाठी १ कोटी ७७ लाख ८० हजार अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

फायदा समजणाऱ्या शेकऱ्यांनी शोधला यंत्राला पर्यायी मार्ग
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने बीबीएफ यंत्राची जनजागृती कृषी विभागाकडून सुरू आहे. परंतु, अनेक ठिकाणी हे यंत्र उपलब्ध होत नाहीत. शेतकरी एका विशिष्ट वेळेत पेरणीचा प्रयत्न करत असतात. तेव्हाही यंत्र मिळण्याची शाश्वती नसते. यामुळे अनेकांनी नियमित पेरणी यंत्राचे एक तोंड बंद करून सरी पाडण्याचा मार्ग शोधला आहे. मात्र, यामध्ये बीयाणांची मात्रा व खोलीचे योग्य नियोजन होत नाही.

बातम्या आणखी आहेत...