आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरणीस विलंब:रब्बीची पेरणी करण्यास सुरुवात, अतिवृष्टीमुळे शेती मशागतीला वेळ

उमरगा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात काही भागात अतिवृष्टीनंतर परतीचा जोरदार पाऊस झाल्यामुळे शिवारात पाणी साचले होते. यामुळे रब्बीसाठी शेताची मशागत करण्यास अडचण आली होती. परिणामी रब्बीच्या पेरणीला उशीर झाला असून उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा शिवारासह तालुक्यातील अनेक भागात रब्बी पेरणी सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांचे मशागतीचे काम बाकी असल्याने यंदाही रब्बीची पेरणी उशिराच होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक भागात अद्यापही सोयाबीन पाण्यात आहे. काही शेतकरी कुजलेले साेयाबीन काढत आहेत. अति पावसामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीन बाहेर काढणे जिकिरीचे झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात तण वाढले असून काढण्यासाठी शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागत आहे. तण मोठे असल्याने काढण्यासाठी ट्रॅक्टरच्या रोटावेटरने शेतीची मशागत करण्याच्या कामांत शेतकरी गुंतलेला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली जात असल्याने काही शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीला सुरुवात केली आहे. अतिवृष्टीमुळे गतवर्षाप्रमाणे यंदाही रब्बीची पेरणी उशिरा होत आहे. मात्र, मुबलक पाणी असल्यामुळे उशीर झाला तरी उत्पन्नाला फटका बसणार नाही. शेवटी महावितरणकडून सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची पेरणी सर्वाधिक होत आहेत. यामध्ये हरभऱ्याचा समावेश सर्वाधिक आहे. काही शेतकरी पशुधनासाठी ज्वारी, मकाचेही उत्पादन घेत आहेत. सध्या रब्बी पेरणीसाठी वातावरण पोषक असून पीक जोमात उगवतात. हरभरा पीक दोन ते तीन पाण्यावर काढणीला येतो. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कल ज्वारीसह हरभऱ्याच्या पेरणीकडे असल्याचे दिसत आहे.

काही शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप
उमरगा तालुक्यात कलदेव निंबाळा शिवारासह परिसरात शेतकऱ्यांनी हरभरा, करडई, ज्वारी तर काही शेतकऱ्यांनी गहू पेरणीस सुरुवात केली आहे. जास्त पाऊस झाल्याने शेत पेरणीसाठी तयार करण्यास नेहमीपेक्षा अधिक खर्च येत आहे. बियाणे, खते, ट्रॅक्टर अथवा बैलजोडीने पेरणीचा खर्च परवडत नसल्याचे शेतकरी चांद पाशा मुल्ला, श्रीधर पावशेरे, नारायण तळेकर आदी शेतकरी सांगत आहेत. कलदेव निंबाळासह परिसरात शेतकऱ्यांना हरभरा, करडई आदी बियाणाचे शासनाच्या वतीने वाटप केले आहे. यामुळे आर्थिक संकटात आलेल्या शेतकऱ्यांना मदत झाल्याची माहिती सरपंच सुनीता पावशेर यांनी दिली.

पेरणी सुरू
अतिवृष्टी व परतीच्या पावसाने विश्रांती दिल्याने थंडीला सुरुवात झाली आहे. शेतकरी सद्या मशागत करण्यासाठी शेतात वाफसा होण्याची वाट पाहत आहेत. काही शिवारात वाफसा झाल्याने शेताची मशागत करून रब्बीची पेरणी सुरू झाली आहे. काही शेतकरी उरले सुरले सोयाबीन काढत आहेत.

बातम्या आणखी आहेत...