आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:गिरवली फाटा ते ईट रस्त्यासाठी रास्ता रोको

ईट10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्टीय महामार्ग ५२ गिरवली फाटा ते ईट या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवताना अनेक दुचाकी व चारचाकींचे अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि. ७) रास्ता राेकाे करण्यात आला. रस्त्याच्या दाेनही बाजूने रांगा लागल्या होत्या. या वेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलन स्थळी भेट देत दोन महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

राष्टीय महामार्ग ५२ गिरवली फाटा ते ईट रस्त्याचे काम गेल्या १० वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम केले जाते. मात्र, संबधित अधिकाऱ्यांकडून हे काम अगदी निकृष्ट दर्जाचे करण्यात येते. या रस्त्यावर दर वर्षी खड्डे पडत आहेत. निकृष्ट कामामुळे शासनाने लाखो रुपये वाया जात आहे. खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी निवेदन दिले होते. ७ मे रोजी ईट व परिसरातील गिरवली, डोकेवाडी, सोन्नेवाडी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांनी गिरवली फाटा येथे रस्ता रोको केला.

आंदोलनास भूम व वाशीचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस. जी. बोराडे, उपअभियंता ए. आर. शिंदे, एस. सी. मुंडे यांनी गिरवली फाटा ते ईट, कलावतणीचा महाल (ईट पाथरूड रोड) पर्यंतचे काम दोन महिन्यात पूर्ण केले जाईल. उर्वरित काम पावसाळा झाल्यानंतर पूर्ण केले जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हा रस्ता रोको मागे घेण्यात आला. या वेळी ईटचे सरपंच संजय असलकर, राष्ट्रवादीचे युवा नेते सुनील देशमुख, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सतीश सोन्ने, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, स्वाभिमानीचे भूम तालुकाध्यक्ष अनंत डोके, अविनाश चव्हाण, इम्रान पठाण, प्रदीप मोटे, रणजित मोटे, वैभव मोटे, सुरेंद्र बोदार्ड, बाबा भोसले आदी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...