आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:78  दिवसांत 84  हजार 756  जणांना बूस्टर डोस ; दिवसाला दिले 1080 डोस

हरेंद्र केंदाळे | उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाकडून १५ जुलै २०२२ पासून सर्वांसाठी मोफत बूस्टर डोस उपलब्ध करण्यात आले.. त्यानंतरही याकडे लाभार्थींनी पाठ फिरवल्याने पाच लाख ४८ हजार ५०७ लाभार्थी यापासून दूर असल्याचे समोर आले. त्यामुळे ७८ दिवसात केवळ ८४ हजार ७५६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात १५ जुलैपूर्वीच आरोग्य, फ्रंटलाइन वर्कर व मोफत बूस्टर डोस घेणाऱ्यांचाही समावेश आहे. त्यानुसार दिवसाला एक हजार ८० डोस दिल्याचे यावरुन समोर आले.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात पहिला आणि दुसरा डोस देण्यात येत आहेत. मात्र, त्यात पुन्हा जुलैपूर्वीच संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने बूस्टर डोस देण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून बूस्टर डोस देण्यास प्रारंभ सुरु केला. आतापर्यंत त्यानुसार ज्यांनी डोस घेतले त्यांनी पूर्वी १८० दिवसांनंतर बूस्टर डोस घेण्याची सूचना दिली हाेती. १५ जुलैनंतर नियमात बदल करुन हा अवधी आता ८० दिवसांवर आणला आहे.

मात्र, त्यानंतरही बूस्टर डोससह नियमित पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांनीही लस घेतली नसल्याचे दिसून आले. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुनही त्याकडे जिल्ह्यातील नागरिकांसह विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे मोठया प्रमाणात लाभार्थी आणि लस असूनही लसीकरणाचा आकडा फारसा वाढला नाही. मध्यंतरी कोरोनाचे रुग्ण वाढत असताना लसीकरणाने वेग घेतला होता. रुग्ण कमी होताच पुन्हा वेग मंदावला आहे.

लसीकरणाकडे लाभार्थींनी केले दुर्लक्ष
डोस उपलब्ध आहेत. लस देण्यासाठी कर्मचारी आणि स्टाफ असून त्यांच्याकडून नियमित लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, लाभार्थींकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने लसीकरण होऊ शकले नाही. आमच्या वतीने अद्याप लसीकरण वाढवण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. - डॉ. कुलदीप मिटकरी, जिल्हा लसीकरण समन्वयक.

मोफत बूस्टरबाबत कोणतेच आदेश नाहीत
मोफत कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देणे सुरू आहे. त्याची शुक्रवारी अंतिम तारीख होती. मात्र, हे डोस सुरु ठेवावे की बंद करावे, याचे कोणतेच आदेश अद्याप प्रशासनाला प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे उद्याही नियमित बूस्टर डोस देणे सुरू राहिल. प्रशासनाकडून डोस देण्याची कोणतीही अडचण नाही.
डॉ. शिवकुमार हालकुडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...