आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्षाचा कळस:बसस्थानकाची इमारत खिळखिळी; तीनदा भूमिपूजन करूनही नवीन बांधकाम होईना

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबादच्या बसस्थानकाची इमारत खिळखिळी झाली असून तीन वेळा भूमिपूजन करूनही नवीन बांधकामाला मुहूर्त मिळालेला नाही. राजकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे येथे इमारतीसाठी निधीही उपलब्ध झालेला नाही. यामुळे सुमारे ५० वर्षांपूर्वीची कालबाह्य झालेली इमारत वापरण्याची वेळ आली आहे. बसस्थानकाच्या आवारात तर थोड्याशा पावसाने चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. प्लॅटफार्मच्या दूर थांबलेल्या बस गाठण्यासाठीही प्रवाशांना कसरत करावी लागत आहे.गेल्या दहा वर्षांपासून बसस्थानकाच्या नवीन इमारतीची मागणी होत आहे. परंतु, काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी, भाजप – शिवसेना युती व आताच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाविषयी अनास्था कायम आहे. याचा त्रास प्रवाशांसह बसच्या उर्वरित पान ४

अन्य ठिकाणी दुसऱ्यांदा बसस्थानक
उस्मानाबादचे बसस्थानक ५० वर्षाचे आहे. याच्या नंतर तुळजापूरला बसस्थानक बांधण्यात आले आहे. तरीही तेथे दुसरे नवीन बसस्थानक उभे केले आहे. तसेच आताही जुने बसस्थानक पाडून तेथेच सुमारे सात कोटी रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. तसेच शेजारील तालुका औसा येथे नवीन इमारत झाली. मात्र, सक्षम लोकप्रतिनिधींचा सक्षम पाठपुरावा नसल्याने राज्य शासन उस्मानाबादकडे ढुंकंूनही पाहत नाही.

आताही केवळ डागडुजीचा प्रस्ताव
सध्या पक्की इमारत गरजेची असतानाही एसटी महामंडळाच्या विभागीय अभियंत्यांनी केवळ डागडूजीची प्रक्रिया केली आहे. यासाठी तीन लाख रुपयांचा प्रस्ताव असून वर्क ऑर्डरही झाली आहे. अशा मलमपट्ट्या सातत्याने करण्यात आल्या आहेत. मात्र, इमारतच इतकी जीर्ण झाली आहे की, याचा काहीही उपयोग होत नाही. तरीही केवळ डागडूजीवरच भर देण्यात स्वारस्य दाखवले जात आहे.

सर्वाधिक उत्पन्न देणारे बसस्थानक
उस्मानाबाद स्थानकात ८४ बसेसच्या २४० फेऱ्या, अन्य आगाराच्या होतात २६० नित्य फेऱ्या.
उस्मानाबाद स्थानकातून दररोज aसुमारे १७ हजार तर अन्य बसफेऱ्यातून उतरणारे सुमारे ४ हजार प्रवासी आहेत.
बसस्थानक, आगार, कर्मचारी निवासस्थान मिळून जवळपास आठ एकरचा एकून परिसर. जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न देणारे, सर्वाधिक प्रवासी, बसेस असणारे येथे बसस्थानक.

मोठ्या दुर्घटनेची शक्यता
दुर्दैवाने जीर्ण इमारत किंवा इमारतीचा भाग मोठ्या पावसात कोसळला तर दुर्घटना घडू शकते. याची चुणूक गतवर्षी पावसाळ्यात दिसून आली होती. त्यामुळे आता तरी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची जागे होण्याची गरज आहे. नंतर प्रवाशांना फटका बसल्यावर सांत्वन करून उपयोग होणार नाही.

गैरसोय टाळण्यासाठी डागडुजी
सध्या निधीची अडचण असल्यामुळे बसस्थानकाचे बांधकाम मागे पडले आहे. हा वरिष्ठ स्तरावरचा प्रश्न आहे. परंतु, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी डागडूजी केली जात आहे. लवकरच आवाराचेही काम करण्यात येणार आहे. प्रवाशांना त्रास होऊ दिला जाणार नाही. शशिकांत उबाळे, विभागीय अभियंता, एसटी.

बातम्या आणखी आहेत...