आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतन:आदेश दिवाळीचे, जिल्ह्यातील शिक्षकांना ऑक्टोबरचे वेतन मिळाले आता

उपेंद्र कटके । उस्मानाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व शिक्षकांना दिवाळीतच ऑक्टोबरचे वेतन देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार रक्कमही उपलब्ध केली होती. मात्र, शिक्षण विभागाने अन्य कामांसाठी रक्कम वापरल्यामुळे वेतन देण्यासाठी २१ नोव्हेंबरची तारीख उजाडली. सध्या शिक्षकांना वेतन वितरित होत आहे. मात्र, यातून उस्मानाबाद तालुका वगळला. दरम्यान, अशी दिरंगाई केल्याबद्दल तत्कालिन शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षण संचालकांनी नोटीस बजावली आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरचे वेतन दिवाळी अगोदर देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार जिल्ह्याला ४६९० शिक्षकांच्या वेतनासाठी सुमारे ३२ कोटी रुपये उपलब्ध केले होते. यासंदर्भात शिक्षकांना अधिकृत माहिती दिली होती. परंतु, ऑक्टोबर संपूनही वेतन मिळाले नाही. काही शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी शासनाकडे तक्रार दाखल केली. यामुळे तत्कालिन शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षण संचालकांनी (प्रा) नोटीस दिली. १० नोव्हेंबरलाच या नोटीस मिळूनही वेतन दिले नाही. अखेर शिक्षकांना २१ नोव्हेंबरला वेतन अदा करण्याची प्रक्रिया सध्याचे शिक्षणाधिकारी रामलिंग काळे यांनी केली. काही शिक्षकांनी दिवाळीला वेतन मिळणार असल्यामुळे अगोदर मिळालेले वेतन खर्चून टाकले. यामुळे काही अशा शिक्षकांना दिवाळीही उत्साहात साजरी करता आली नाही. यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आहे.

३२ कोटी रुपयांची गरज
जिल्ह्यातील शिक्षकांना वेतन अदा करण्यासाठी सुमारे ३२ कोटी रुपयांची गरज असते. शासनाकडून तितकी रक्कमही देण्यात आली होती. परंतु, यातील सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंत बिले अदा करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

उस्मानाबादचे शिक्षक वंचितच
उस्मानाबाद तालुक्यातील शिक्षकांना वेतनातून वगळले. उर्वरित तालुक्यातील शिक्षकांना वेतन दिले. उस्मानाबादच्या सुमारे ९०० शिक्षकांना वेतन मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यांना आगामी तीन ते चार दिवसात वेतन मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सध्या तरी या शिक्षकांना वेतन देण्यासाठी शिक्षण विभागाकडे पैसाच शिल्लक नाही.

शासनाची प्रतिमा मलिन
तत्कालिन शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतन अदाईत दिरंगाईच्या कारणावरुन त्यांना शिक्षण संचालकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. यामध्ये नमुद केल्यानुसार शिक्षकांना वेतनासाठी रक्कम उपलब्ध केली असतानाही वेतन दिले नाही. यामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाल्याचे नोटीसमध्ये म्हटले. यामुळे तातडीने खुलासा देण्याचे आदेश आले. राज्यातील २१ झेडपीत अशी दिरंगाई झाली.

जुनी बिले केली अदा
काही शिक्षक संघटना वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलांसाठी पाठपुरावा करत होते. तसेच सातव्या वेतन आगोयाने तिन्ही हप्ते, महागाई भत्ते, पूर्वीचे थकलेले वेतन आदी रक्कम दिली. याची माहिती वरिष्ठ स्तरावर “बीम्स’ प्रणालीवर नमूद आहे. कधी नव्हे ते लवकर बजट मिळाल्याने तत्कालिन शिक्षणाधिकाऱ्यांनी अशा अन्य बिलांची अदाई केली. यासाठी इतकी घाई “अर्थ’पूर्ण व्यवहारासाठी केल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...