आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कळंबमध्ये प्रचाराचा जोर वाढला, 88 इच्छुक ; महिलांचाही प्रचारात सहभाग

डिकसळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील ३० गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराला जोरदारपणे सुरुवात झाली असून गावोगावी प्रचाराने वेग पकडला आहे. सोमवारी सकाळी बहुतांशी गावात प्रचाराचे नारळ फुटले आहेत. कळंब तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी जोरदार पणे सुरु झाली आहे. माघारीच्या प्रक्रियेत कांही सदस्य वगळता तालुक्यातील एकही ग्रामपंचायत बिनविरोध निघाली नाही. त्यामुळे सध्या तीसही गावांत निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. या गावात सरपंचपदासाठी ८८ तर सदस्यपदासाठी ६५६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर पॅनल बांधणी करुन प्रचार यंत्रणा सक्रिय झाली, तालुक्यातील बहुतांशी गावात प्रचाराचे नारळ फुटले.

ग्रामदैवतांना साकडे घालून सकाळी प्रचाराची हलगी कडाडली. गल्लोगल्ली मतदारांना नमस्कार करत प्रचार फेऱ्या काढण्यात आल्या. त्यानंतर प्रभाग निहाय व्यक्तिगत गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. आणाभाका व इतर क्लृप्त्यांचा सर्रास वापर सुरु आहे. एकीकडे थंडीचा कडाका वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण थंडीतही गरम होऊ लागले आहे. मतदान १८ डिसेंबर रोजी होत असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येईल, तसे वातावरण तापतच जाणार आहे. साम, दाम, दंड या नीतीचा वापर सर्रास सुरु असल्याने काही गावांत आतापासूनच तणावाचे वातावरण आहे. यामुळे २० तारखेला मतमोजणीदिनी काय स्थिती असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गटातटाचे शक्तिप्रदर्शन प्रचाराचा प्रारंभ करताना प्रत्येक गावात दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. प्रारंभ करतानाच एकमेकांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न झाल्याने वातावरण तापू लागले आहे.घराशेजारचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. भावकी भावकीत दोन-तीन उमेदवार असल्याने प्रचारासाठी जायचे कोणाकडे असा प्रश्न प्रत्येक गावात आहे. कोणत्याही राजकीय गटासोबत नसणाऱ्यांची तसेच तटस्थ असणारांची गोची झाली आहे. याचा परिणाम लवकरच दिसेल.

रणरागिणी ही सरसावल्या आता गावच्या राजकारणातही महिला सरसावल्या असल्याने घरोघरी प्रचार करण्यासाठी गळ्यात गमजे , डोक्यावर टोपी , हातात निवडणूक चिन्ह घेऊन महिला फिरताना दिसत आहेत. महिला प्रचार रॅलीत समोर तर पुरुषमंडळी त्यांच्या मागे चालताना दिसत आहेत.

मतांची जुळवाजुळव गावच्या ग्रामपंचायतमध्ये प्रवेश करण्यासाठी गटातटाचे राजकारण जोरदार पेटले आहे. मतांची जुळवा जुळव करताना उमेदवारांची मात्र चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. काही वेळापूर्वी आपल्या सोबत असणारे समर्थक काही वेळानंतर विरोधकांसोबत फिरताना दिसत आहेत त्यामुळे कोण आपला आणि कोण विरोधकांसोबत हे समजायला उमेदवारांना अडचण येत आहे. निवडणूक होण्यापूर्वीच ही स्थिती दिसून येत असल्याने निवडणुकीनंतरचा राजकीय रंग कोणता याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...