आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावीच्या इंग्रजी व गणित विषयाची प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता शिक्षण मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशीही खेळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आला.
सोमवारी दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. सीबीएसई व स्टेट बोर्ड अशा दोन्ही विद्यार्थ्यांचे परीक्षा सेंटर अनेक शाळांमध्ये एकाच ठिकाणी होते. मात्र परीक्षा नियंत्रक व पर्यवेक्षकांच्या चुकीमुळे स्टेट बोर्डाच्या (मराठी माध्यम) विद्यार्थ्यांना काठिण्य पातळी जास्त असलेल्या सीबीएसई बोर्डाची (इंग्रजी माध्यम) प्रश्नपत्रिका देण्यात आली. धाराशिव शहरातील शरद पवार हायस्कूल व जळगावच्या प. न. लुंकड कन्या शाळेतील परीक्षा केंद्रावरील प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा प्रकार घडला. न शिकवलेला अभ्यासक्रम पेपरमध्ये आल्याने हे विद्यार्थी गोंधळून गेले. त्यांनी पर्यवेक्षकांना कल्पना दिली, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
परीक्षा संपल्यानंतर बाहेर उभ्या पालकांना हा प्रकार मुलांनी सांगितला, त्यांनी केंद्रावरील शिक्षकांना जाब विचारला. मात्र विद्यार्थ्यांनी आम्हाला उशिरा सांगितले. नंतर बोर्डाला कळवलेेे, अशी माहिती लुंकड शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती नेवे यांनी दिली. दरम्यान, ३ मार्च रोजी सिंदखेडराजा येथे बारावी गणिताचा पेपर फोडून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या पाच शिक्षकांसह सात जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
चूक गंभीर पण फेरपरीक्षा नाही, विद्यार्थ्यांना न्याय देणार : बोर्ड
नाशिक विभागीय अध्यक्ष बोर्डाचे नितीन उपासनी म्हणाले, ‘ही चूक गंभीरच आहे. मात्र अशा विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याची तरतूद नाही. त्यांच्या उत्तरपत्रिका स्वतंत्रपणे तपासल्या जातील. चूक करणाऱ्या केंद्र संचालक, सुपरवायझर यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करू. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.