आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्लेख:माडज गावात  चालुक्य कालीन महादेव मंदिर; शिलालेखात महत्वाची माहिती

उमरगा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात माडज गावाला धाकटे पंढरपूर म्हणून ओळखले जात आहे. गेल्या हजारो वर्षापासूनची परंपरा आजतागायत सुरूच असतानाच आता नव्याने प्राचीनकालीन महादेव मंदिरामध्ये चालुक्य कालीन इतिहास आढळून आल्याने त्यामध्ये भर पडली आहे.माडज गावाला चालुक्य कालीन इतिहास असल्याचे स्पष्ट झाले असून येथील शिलालेखाचे वाचन ही झाले आहे. सन ११२३ मध्ये माडजचा मूलवट्टी म्हणून उल्लेख असून येथे सोमरसने मंदिर उभारून केशव देवाची स्थापना केल्याचा उल्लेख आढळून आलेला आहे.

तालुक्यात माडज गावात प्राचीनकालीन जुने महादेव मंदिर आणि पुष्करणी आहे. या मंदिराच्यासमोर जुन्या कन्नड लिपीतील शिलालेख मंदिराला टेकून ठेवलेला असून त्याचे वाचन झाल्याचे आजतागायत कोठे आढळले नसल्याने इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे यांनी शिलालेखाचे ठसे घेऊन संशोधन केले असता माडज येथील मंदिर व गावाविषयी महत्वपूर्ण माहिती पहिल्यांदाच उजेडात आली आहे. सदर शिलालेख हा वरील व खालील बाजूस थोडा फुटला आहे. त्यावर वरील बाजूस गाय, खडग आणि विष्णू कोरले आहे. हा शिलालेख २८ ओळीचा असून जुन्या हळे कन्नड लिपी भाषेतील आहे.

या शिलालेखाची सुरुवात विष्णूच्या वराह अवताराच्या स्तुती श्लोकाने झाली असून त्यानंतर शिवस्तुती व वंदन करणारा श्लोक आलेला आहे. कल्याण चालुक्य राजा त्रिभुवन मल्लदेव म्हणजेच विक्रमादित्य सहावा याचे अनेक बिरुदे शिलालेखात आली असल्याने जयंतीपुर म्हणजे बनवासी येथुन राज्य करताना शोभुकृत संवत्सर वैशाख शुद्ध त्रयोदशी वार रविवार रोजी हा शिलालेख स्थापिला आहे.

बल्लहदेवचा मुलगा सुरीमय सोमरस या अधिकाऱ्याने मुलवट्टी म्हणजेच माडज गावात केशव देवाची प्रतिष्ठापना केली आहे. तसेच अनेक जमीन दान दिल्या. दान दिलेल्या जमिनीच्या सीमा शिलालेखात सांगण्यात आलेल्या आहेत. कोंडजीला जाणाऱ्या मार्गावर असलेल्या खड्डयापासून ते देवदत्त चट्टोपाध्यय यांचे शेताचे पर्यंत तर वाघाच्या डोंगरापासून ओहोळ पर्यंत अशा अजून काही सीमा दिल्या आहेत पण अक्षरे खराब झाल्याने सीमा समजत नाहीत.

सीमा असलेली तीन मत्तर जमीन मूलवट्टि येथे दान दिली. तर गावच्या दक्षिणेला शेत मळा दान दिला. किती दान दिला हे समजत नाही कारण त्याठिकाणी सदर शिलालेख फुटलेला आहे. पुढे मूलदिघे येथे शंभर मत्तर शेत जमीन त्रैलौक्यमलने केशव देवाला दान दिली असे याच शिलालेखात नमूद केले आहे. दिलेले दान जो कोणी मोडेल किंवा बळकावले तो पुढील ६० हजार वर्षे विष्टेतील किडा होवून जन्म घेईल या आशयाचा शिलालेखाचा शेवट झाला आहे.

सविस्तर शोधनिबंध सादर करणार,शिलालेखाचे वाचनही झाले
या ठिकाणाहून दान दिल्याचे अनेक उल्लेख हे शिलालेखांत आढळतात शिलालेखाच्या वाचनाने माडजच्या इतिहासात आणखीन भर पडलेली असून मंदिराचा व गावचा चालुक्य कालीन इतिहास नव्याने उजेडात आला आहे. यावर सविस्तर असा शोधनिबंध सादर करणार असल्याचे इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे म्हणाले. या शिलालेखाचे वाचन डॉ रविकुमार नवलगुंडा यांनी केलेले असून भाषांतरात डॉ सुजाता शास्त्री यांची मदत झाली आहे. तर अजिंक्य शहाणे, अभय परांडे, सत्यनारायण जाधव यांचीही मदत झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...