आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत अनेक शिक्षकांनी दिव्यांग व गंभीर आजार असल्याचे दाखवून संवर्ग-१ मध्ये समावेश करुन घेतला व त्यातील अनेक शिक्षकांनी बदलीमधून सूट घेतली तर काही शिक्षकांनी प्रथम पसंतीक्रम घेऊन सोयीच्या ठिकाणी बदली करुन घेतली असून, अशा संवर्ग १ मधून बदली करुन घेतलेल्या व बदलीतून सुट घेतलेल्या शिक्षकांची वैद्यकीय मंडळामार्फत तपासणी करुन बोगस व दिव्यांगाची टक्केवारी वाढऊन घेतलेल्या शिक्षकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे केली आहे. राज्यात ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णायानुसार जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक,प्राथमिक पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक यांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरु आहे. बदली प्रक्रियेत शासनाने एकुण ४ संवर्ग तयार केले असून, प्रत्येक संवर्गाचे बदली प्रक्रियेचे निकष वेगळे आहेत.
यात संवर्ग १ मध्ये पक्षघाताने आजारी, ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेले, हदयशस्रक्रिया झालेले,जन्मापासून एकच मुत्रपिंड असलेले, यकृत प्रत्यारोपण झालेले, कर्करोगाने आजारी शिक्षक व त्यांचे जोडीदार तसेच थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक असलेले शिक्षक, कुमारिका ,विधवा, घटस्फोटित-परितक्त्या शिक्षक यांचा समावेश आहे. या संवर्ग-१ मध्ये असलेल्या शिक्षकांना बदलीमधून सूट आहे. म्हणजे सेवानिवृत्त होईपर्यत ते एकाच शाळेत राहु शकतात किंवा सर्वांअगोदर पाहिजे त्या शाळेत बदली मागता येते. यामुळे या संवर्ग-१ मध्ये जाण्यासाठी काही शिक्षकांनी गंभीर आजारी असल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखवून लाभ घेतला आहे.
तर काही शिक्षकांनी अपंगत्वाची कमी टक्केवारी असताना जिल्हा रुग्णालयातून ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र घेऊन लाभ घेतल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही जणांचे प्रमाणपत्रच बोगस आहे, असा दावाच शिक्षकांनी निवेदनात केला आहे. यामुळे खरे गंभीर आजारी किंवा दिव्यांगांवर अन्याय होतो. तसेच अन्य महिला शिक्षकांनाही कुटुंबापासून दूर गैरसोईच्या शाळेत जावे लागत आहे.
संवर्ग-२ मध्ये ३० किमीपेक्षा जास्त अंतरावरीवरील पती-पत्नी एकत्रिकरणासाठी आहे. संवर्ग-३ अवघड क्षेत्रातील शिक्षकांसाठी आहे. मात्र जिल्ह्यात अवघड क्षेत्र नसल्यामुळे हा संवर्ग लागू नाही. बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बदली प्रक्रियेत दिव्यांगाचे व गंभीर आजाराचे बोगस, खोटे प्रमाणपत्र, अपंगत्वाची जास्त टक्केवारी दाखवून बदलीचा लाभ व सूट घेतलेल्या शिक्षकांची वैद्यकीय मंडळामार्फत तपासणी करुन ७८ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली.
आपल्या जिल्ह्यातही अशा बोगस दिव्यांग व गंभीर आजारी शिक्षकांचा वैद्यकीय मंडळामार्फत तपासणी करुन शोध घेत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर साधन झालटे, मनिषा कांबळे, बालाजी पवार, सुनिता गायकवाड, अभिजीत उंबरे, सचिन तामाने, संजय तांबारे, सूवर्णमाला डिकले, संतोष ठोंबरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.