आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जय महाराष्ट्र':महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला मोठा धक्का, ठाकरे गटाचे राम गावडेही पक्ष सोडणार

धाराशीव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी पक्ष सोडणार असून शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.

धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का बसला आहे. यामध्ये 3 माजी नगराध्यक्ष, 6 माजी उपनगराध्यक्ष, 2 माजी नगरसेवक यांच्यासह जवळपास 25-30 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा प्रवेश सोहळा होणार आहे.

राष्ट्रवादीला धक्का

आज महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर शहरात वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना अशी एकत्रित सभा होणार आहे. सभेला अवघे काही तास शिल्लक असताना आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

ऐन सभेआधीच धाराशीवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी पक्ष सोडून शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का आहे.

उद्धव ठाकरेंनाही धक्का

'शिवसेनेचा राम' म्हणून ओळख असणारे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

गावडे यांच्यासोबत त्यांचे समर्थक, गावोगावचे सरपंच-उपसरपंच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत येत्या 5 तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.