आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअडीच वर्षांपासून मरगळ आलेल्या पोल्ट्री व्यवसायाने अचानक उसळी घेतली. खाद्याचे भाव वाढताच चिकनचे दर वाढले असून, बाजारात चिकनथाळी महागली. मात्र, ही भाववाढ कायम राहणार नाही. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोंबडीचे दर कमी झाल्याचे पोल्ट्रीचालक सांगत आहेत. दुसरीकडे बाजारातही १८० ते २०० रुपये प्रति किलोपर्यंतचे चिकन दर २४० ते २६० वर पोहोचले.
कोरोनाच्या आगमनादरम्यान अनेक गैरसमज असल्याने राज्यातील अनेक पोल्ट्रीचालकांनी कोंबड्या नष्ट केल्या. काही महिने कोंबड्यांच्या माध्यमातूनही कोरोना संसर्ग होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. परिणामी चिकनची विक्री ठप्प झाली होती. काही महिन्यांत हा गैरसमज दूर झाल्यानंतर चिकनच्या व्यवसायाने उचल खाल्ली. किंबहुना लॉकडाऊनमध्ये चिकनची विक्रमी विक्री सुरू झाली. मात्र, भाववाढ होत नव्हती. जिवंत कोंबडीच्या पट्टीनुसार बाजारात चिकनचे दर ठरतात. या काळात १०० रुपयांच्या आतच कोंबडीचे दर असल्याने १२० ते १४० रुपये प्रतिकिलो चिकनची विक्री होत होती. सहा महिन्यांपासून पट्टी वाढू लागली. परिणामी चिकनचे दरही हळहळू वाढत गेले. ३ महिन्यांपूर्वी २०० ते २२० रुपयांवर असलेल्या चिकनचे दर गेल्या १५ दिवसांत अचानक २६० रुपयांवर गेले. त्याचे कारण जिवंत कोंबडीचे दरही वाढले. बाजारात कोंबड्यांचे खाद्य महागल्याने पट्टी वाढल्याचे पोल्ट्रीचालकांनी सांगितले. वास्तविक, खाद्याचे भाव कमी झाल्यास पट्टीही कमी होते. गेल्या चार दिवसांत पट्टी कमी होत असल्याने चिकनचे भाव कमी होताना दिसत आहेत. मात्र, हॉटेल्समधील चिकनच्या प्लेटचे भाव चढलेलेच आहेत.
अशी झाली भाववाढ
कोंबडीसाठी लागणारे खाद्य तीन प्रकारात असते. त्यानुसार त्याचे वेगवेगळे दर असतात. गेल्या महिन्यापर्यंत हे दर १८०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल होते. मात्र आता २३०० ते २७०० रुपये अशी भाववाढ झाली आहे. परिणामी कोंबडीची पट्टी (दैनंदिन भाव) १६३ रुपयांवर पोहोचली. चार दिवसात भाव पुन्हा खाली आले आहेत. मंगळवारी जिवंत कोंबडीचे दर १४० रुपये होते.
चिकन प्लेट ८० वरून ११० वर
दरवाढीने १ एप्रिलपासून चिकन प्लेट ८० वरुन ११० रूपये करण्यात आले. चिकन बिर्याणीचे दरही १० रुपयांनी वाढवले. महिनाभरापासून चिकनचे दर वाढत आहेत. त्यामुळे दरवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता.२० टक्क्यांनी चिकनथाळी महागली आहे. मनोज सुरवसे, हॉटेल चालक, उस्मानाबाद.
खाद्य महागल्यामुळे भाव वाढले
कोंबडी खाद्याच्या दरात अचानक वाढ झाली. परिणामी पोल्ट्री व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता होती. मात्र बाजारपेठेत जिवंत कोंबड्यांची पट्टी वाढल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र, ही भाववाढ राहीली नाही. १६३ रुपयांवरुन १४० रुपयांपर्यंत पट्टी आली आहे.त्यामुळे चिकनचे भावही कमी झाले आहेत. शैलेश देशमुख, पोल्ट्रीचालक, उस्मानाबाद.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.