आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री तानाजी सावंत आणि जिल्हाधिकारी दिवेगावकरांमध्ये वाद:उस्मानाबादच्या 'ओएसडी'वरून कलह; मुख्य सचिवांकडे तक्रार

उस्मानाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी सावंत यांनी थेट राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केल्याचे समजते.

सावंत यांनी नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दमदाटी केली असून, ही बाब गंभीर असल्याचे सावंत यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी मात्र सदरील अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे शासनाकडून आदेश आलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ऑगस्टमध्ये नियुक्ती

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सोमनाथ रेड्डी यांची 18 ऑगस्ट 2022 रोजी नियुक्ती केली आहे. रेड्डी हे यापूर्वी उस्मानाबादला सहायक नियोजन अधिकारी म्हणून कार्यरत होते, तर आता ते लातूरला कार्यरत आहेत. मात्र, विशेष कार्यकारी अधिकारी पदावरील नियुक्तीनंतर ते उस्मानाबादमध्ये कामकाज पाहत आहेत.

फोनवरून झापले

रेड्डी यांनी आरोग्यमंत्री सावंत यांना 1 सप्टेंबर रोजी पत्र दिले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांना आरोग्यमंत्री सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या काही कार्यालयासंबंधी माहिती घेण्याची सूचना दिली होती. त्यानुसार ते माहितीसाठी प्रपत्र सादर करत असताना 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11:08 वाजता जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे स्वीय सहायक डी. एस. कुलकर्णी यांच्या फोनवरून दिवेगावकर यांनी ही माहिती कोणत्या अधिकारांमध्ये संकलन करत आहे, याबाबत विचारणा केली.

माहितीवरून पडली ठिणगी

रेड्डी यांनी आपण आरोग्यमंत्री सावंत यांच्या निर्देशानुसार माहिती संकलित करत असल्याचे सांगितले. तसेच 15 ऑगस्ट रोजी घेतलेल्या बैठकीमध्येही ही माहिती संकलित करत असल्याबद्दल आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबद्दल कल्पना दिल्याचे सांगितले. त्यानंतरही जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी अर्वाच्च शब्दांमध्ये सदर माहिती संकलित करू नये व सदर माहिती आरोग्यमंत्री यांच्या निर्देशावरून संकलित करू नये. माहिती संकलित केल्यास फौजदारी गुन्ह्यासाठी पात्र रहाल. जिल्हाधिकारी म्हणून शासकीय कामात ढवळाढवळ केल्याचा गुन्हा दाखल करू, असा इशारा दिला.

मंत्र्यांनी लिहिले पत्र

रेड्डी यांच्या पत्राची गांभीर्याने दखल घेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तातडीने मुख्य सचिव श्रीवास्तव यांना पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांची बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून, शासनाची प्रतिमा मलिन करणारी व मंत्री आस्थापनेच्या कामात अडथळा निर्माण करणारी असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी आरोग्यमंत्री सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही तसेच मॅसेजलाही उत्तर दिले नाही.

तोंडी आदेशावर काम

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले की, रेड्डी यांच्या नियुक्तीचे आदेश अद्यापपर्यंत प्राप्त नाहीत. रेड्डी हे अजूनही लातूरच्या नियोजन विभागात कार्यरत आहेत. शिवाय त्यांनी तोंडी आदेश देऊन काही कामे स्थगित करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात नियोजन विभागाला तसेच आयुक्तांना पत्र पाठविले आहे. एखाद्या अधिकाऱ्याने कोणत्याही शासकीय आदेशाशिवाय सरकारी कामात हस्तक्षेप करणे नियमाला धरून नाही. शासनाचे लेखी आदेश आल्यास नियमांचे पालन करू.

बातम्या आणखी आहेत...