आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वातावरणात बदल; ताप, सर्दीसह साथीचे आजार बळावले

उस्मानाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधुनमधून गारवा अन् उकाड्याचा परिणाम; जिल्हा रुग्णालयात रुग्ण वाढले, लहानांसह वृद्ध अधिक

वातावरणात बदलामुळे ताप, सर्दी, खोकल्यासह अन्य साथीचे आजार बळावले असून जिल्हा रुग्णालयात गर्दी वाढली आहे. यामध्ये सर्वाधिक लहान मुलांसह वयोवृध्दांचा समावेश आहे. शुक्रवारी, शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीत थंडी, ताप, खोकला यासह इतर रुग्णांची एक हजारापेक्षा जास्त नोंद झाली आहे. मात्र, कोरोना संपल्याच्या अविर्भावात कोणीच मास्क घालत नाहीत. सर्दी हा संसर्गजन्य आजार असून कोरोनाही संपलेला नाही, यासाठी नागरिकांनी नियमित मास्क घालण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

फेब्रुवारी अखेरपासून तापमानात वाढ झाली असून २९ ते ३० अंशावरील तापमान ३६ अंशापर्यंत गेले होते. अचानक बदलामुळे ढगाळ वातावरण झाले. अधुनमधून थंड हवेमुळे तापमानाचा पारा जवळपास ३० अंशावर आला आहे. यामुळे काही भागात तुरळक पाऊसही पडत आहे. यामुळे लहान मुलांसह वयोवृध्द नागरिकांना ताप, सर्दी, खोकल्यासह अन्य साथीचे आजार वाढत आहेत. तापमान कमी अधिक होत असल्याने तसेच थंड पेयय घेतल्यामुळे घशाला थ्रोट इन्फेक्शन होत आहे. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय डॉक्टरांच्या दालनात व दालनासमोर रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र, काही डॉक्टर नेहमीप्रमाणे लेट लतीफ असल्याने रुग्णांची गैरसोय होते. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी डॉक्टरांनी ओपीडीच्या वेळेत उपस्थित राहून रुग्णांना सेवा देण्याची गरज आहे. अनेक डॉक्टरांच्या दालनासमोर नेहमीच गर्दी दिसते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तत्काळ रुग्णांवर उपचार होणे गरजेचे आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयात तसे होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा रुग्णालयात बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातील येत आहे. वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहेत. आणखी काही दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या वाढली
जिल्हा रुग्णालयात स्त्री, पुरुष वॉर्डासह बालरुग्ण विभागात जवळपास ७० रुग्ण दाखल आहेत. यामध्ये सर्वाधिक ताप, थंडी, खोकल्याचे रुग्ण आहेत. शुक्रवारी दिवसभरात ८०० पेक्षा अधिक रुग्णांची ओपीडीत नोंद झाली आहे. वयोवृद्ध रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे.

थंड पाणी पिणे टाळावे, मास्क वापरण्याची गरज
वातावरणातील बदलामुळे लहान मुलांसह वयोवृध्द नागरिकांना सर्वाधिक ताप, सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढते. नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तत्काळ औषधोपचार करावा. थंड पाणी पिणे टाळावे. फळांचे जास्तीत जास्त सेवण करावे. कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी नियमित मास्क वापरण्याची गरज. डॉ. एन. बी. गोसावी, जनरल सर्जन.

बातम्या आणखी आहेत...