आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ढगाळ वातावरणामुळे पारा घसरला, हवेतील आर्द्रता कमी झाल्याने उकाड्यात मोठी वाढ; असनी वादळाचा वातावरणावर अप्रत्यक्ष परिणाम

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील पंधरा दिवसांत उष्णतेच्या लाटेत होरपळून निघालेल्या नागरिकांना मे महिन्यात उकाड्याचा सामना करावा लागत आहे. शनिवारी (दि.१४) ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्याचे तापमान ४० अंशावर असले तरी वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा होता. हवेत मोठ्या प्रमाणात उष्णता असल्याने रात्री तापमान २७ अंशावर होते.

बंगालचा उपसागर व अंदमान बेटाजवळ समुद्रात असनी चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम जिल्ह्यातील उष्णतेवर होत आहे. उष्णतेची लाट अधिक तीव्र होत आहे. समुद्रातील वादळामुळे हवेतील बाष्प शोषले जात असल्याने वातावरणातील आर्द्रता कमी होत आहे. हवेतील कोरडेपणा वाढल्याने उष्ण वारा अधिक तीव्र होत आहे. सध्या दिवसा व रात्रीही भयानक उष्णता जाणवत आहे. याबाबत जिल्हा हवामान निरीक्षकांशी चर्चा केली असता आगामी काही दिवस उकाडा व ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

रात्री जमिनीतून उष्णतेच्या वाफा जाणवत आहेत. अनेकवेळा कधी गरम तर कधी थंड हवेची झुळूक जाणवते. यामुळे आरोग्याचे प्रश्न वाढत आहेत. तापमानाचा पार चांगलाच वाढल्याने चक्कर येणे, थकवा, मळमळ, उलटीचे रुग्ण वाढले आहे. रुग्णालयात ओपीडीमध्ये दिवसाला ३० ते ४० रुग्ण हे उष्माघाताची लक्षणे असलेले आढळून येत आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्याचा पारा कमी झाला असला तरी वातावरणातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तीव्र उन्हाने उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आहे. चक्कर येणे, थकवा, मळमळ, उलटी, अस्वस्थ वाटणे या रुग्णांत वाढ झाली आहे. उष्माघाताची लक्षणे दिसताच रुग्णास नारळ पाणी पाजावे. रुग्ण असलेल्या खोलीचे तापमान थंड ठेवा. पंखे, कुलरचा वापर करा. रुग्णाच्या अंगावर ओले कापड टाकावे. मीठ, साखर, पाण्याचे मिश्रण द्यावे. खूपच त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...