आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उत्तरेत थंडीची लाट, जिल्ह्यात 4 अंशांनी घसरला पारा ; तापमान 11 तारखेला 13 अंशांपर्यंत घसरले

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थंडीला सुरुवात झाली असून चार दिवसांपूर्वी १७ अंशावर असलेला किमान तापमानाचा पारा शुक्रवारी (दि.११) १३ अंशावर आला आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात थंडी आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात बरसात केल्याने पाणथळ क्षेत्रात पाणी आहे. यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा थंडीचा कडाका अधिक जाणवणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

परतीच्या पावसानंतर आता थंडी सुरू झाली असून उत्तरेकडील राज्यांमधील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रमध्येही हुडहुडी भरली आहे. पुणे, साताऱ्याबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यातील तापमानातही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. ८ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याचे किमान तापमान १७ अंशावर नोंदवले होते तर शुक्रवारी १३ वर घसरला आहे. दिवसेंदिवस तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये थंडी वाढण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यापासून थंडी मोठ्या प्रमाणात वाढली होती. गतवर्षीही सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. यामुळे शेत शिवारातील पाणथळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले होते. दरम्यान हवेचा वेगही अधिक असल्याने थंडीचा कडाका अधिक जाणवत होता. पिकांवर दवही पावसासारखे जाणवत होते. गारठ्यामुळे दम्यासह त्वचारोगाचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात वाढले होते. यामुळे जिल्हा रुग्णालयात वयोवृध्दांसह लहान मुलांची काळी घेण्यासाठी व्यवस्था केली होती. यंदाही थंडीचे प्रमाण अधिक जाणवण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाला सतर्क राहण्याची गरज असून दम्यासह त्वचारोगाच्या औषधाची उपलब्धता करावी लागणार आहे. थंडीमुळे शहर, गावातील चौकात, रिक्षास्थानकारव शेकोट्या पेटल्या आहेत. तसेच लहान मुलांसह वयोवृध्दांसाठी उबदार कपडेही खरेदीला वेग आला आहे. सर्वाधिक कान टोपीची मागणी होत आहे.

तापमानात घट सुरूच दिवसेंदिवस तापमानाचे प्रमाण कमी होत असून नोव्हेंबर अखेरपर्यंत ११ ते १२ अंशावर किमान तापमान येण्याची शक्यता आहे. अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे बदल होऊ शकतो. मात्र, डिसेंबर महिन्यात ८ ते १० च्या दरम्यान तापमानाचा पारा खाली येऊ शकतो. दरम्यान, वाऱ्याचा वेग अधिक झाल्यास थंडी अधिक जाणवेल. -ए. के. भड, तापमान निरीक्षक, उस्मानाबाद.

बातम्या आणखी आहेत...