आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भोंग्याबाबतच्या आंदोलनामुळे बुधवारी जिल्ह्यात काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे कडेकोट पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र, केशेगाव (ता. उस्मानाबाद) येथे हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकत्रित हनुमान चालिसा व नमाज पठण केले. तसेच नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथे मौलवींनी नियमानुसार अजानच्या वेळी भोंग्यांचा आवाज ठेवण्याचे आवाहनही केले. यामुळे मनसेने त्यांचा सत्कारही केला. अशा कार्यक्रमांमुळे जिल्ह्यातील तणाव निवळण्यास मदत झाली.
मनसेच्या भोंग्याबाबतच्या आवाहनामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे व उस्मानाबाद तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख यांच्यासह काही नेत्यांनी पक्षादेशाप्रमाणे काम करणारच, असा पवित्रा घेतला होता. यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही संवेदनशिल गावे व उस्मानाबाद शहरातील संवेदनशिल भागात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. परंतु, जिल्ह्यात काही सकारात्मक घटना घडल्यामुळे तणाव निवळून पुन्हा सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले.
उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथील रहिवाशी तथा पुण्याच्या आरोग्य सेवा विभागातील राज्यस्तरीय साथरोग अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे यांच्या पुढाकाराने सामाजिक सलोख्याचे आगळेवेगळे वातावरण पाहण्यास मिळाले. ईद निमित्त डॉ. डोलारे यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी जवळपास परिसरातील २ हजार लाेकांचा जमाव होता. यासोबतच स्टेजवरच सायंकाळी ईदनिमित नमाज अदा करण्यात आली. यामध्ये हिंदू समाजाच्या लोकांनीही सहभाग नोंदवत प्रार्थना केली. यानंतर लगेच हनुमान चालिसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांनी टाळ्या वाजवत यामध्ये सहभाग नोंदवला. दोन्ही कार्यक्रमात दोन्ही समाजाच्या लोकांनी सहभाग नोंदवला. शेवटी ईदनिमित्त सर्वांना शिरखुर्म्याचीही मेजवानी देण्यात आली.
नळदुर्गला मुस्लिम समाज, धर्मगुरुंच्या आवाहनानुसार भोंग्याबाबतचे नियम पाळणार
नळदुर्ग येथील मुस्लिम धर्मगुरु सगीर जागिरदार यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून, इतर धर्मीयांना कसल्याही प्रकारचा त्रास न होता, आजान म्हणावी. भोंग्यांची परवानगी घ्यावी, आवाज ठरवून दिलेल्या मर्यादेतच असावा, भोंगे रात्री १० ते पहाटे ६ या वेळेत बंद ठेवण्याचे आवाहन केले. यामुळे त्यांचा मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह सत्कार केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे, श्री मोटे, पोलीस कर्मचारी, मनसेचे जिल्हासचिव जोतिबा येडगे, नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सचिव प्रमोद कुलकर्णी उपस्थित होते.
धर्मांधतेपेक्षा करिअर महत्त्वाचे
केशेगावात डॉ. डोलारे यांनी आपल्या कीर्तनात सांगितले की, धर्माचे पालन व्हावे, परंतु, धर्मांधतेचे पालन होऊ नये. त्यापेक्षा युवकांचे करिअर महत्त्वाचे असते. धार्मिक उन्मादाने शेवटी दुख:च पदरी पडते. राजकारण्यांना चांगले दिवस येतात व याच्या आहारी गेलेल्या युवकांना मात्र, आपल्या जीवनाची आहुती द्यावी लागते. धार्मिक सलोखा, सर्व धर्माचा आदर व एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानेच आनंद वाढत जातो.
सर्वच धर्मीयांचे घेतले कार्यक्रम
डॉ. डोलारे यांच्या पुढाकारातून केशेगावात सर्व धर्मीय प्रार्थना झाली. रमजान ईद, अक्षय तृतीया, महात्मा बसवेश्वर जयंती, भगवान परशुराम जयंती यासोबतच जैन व बौद्ध धर्मियांचाही कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी सर्वच कार्यक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. कार्यक्रमामुळे केशेगावात उत्सवाचे स्वरूप आले हाेते. त्यात यमुनाबाई वाघाळे व बसवंतअप्पा वाघाळे यांचा जन्मशताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला.
परिणाम भोगावे लागतील
नळदुर्ग येथे नवगिरे म्हणाले की, ज्या धर्मीयांच्या भावना दुखावल्या म्हणून ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक व सुडबुध्दीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुन्हा नोंद केला. त्याच धर्माच्या व समाजाच्या धर्मगुरूंनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. मग केवळ जाणीवपूर्वक व सुडबुद्धीने त्यांच्यावर गुन्हा नोंद करणे व नोटीसा देणे, हे या आघाडी सरकारला खूप महागात पडणार आहे. याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.