आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या आठ दिवसांत तापमानाने चाळिशी पार केल्याने उष्णता कमालीची वाढली आहे. उष्माघाताच्या आजारासोबतच कडक उन्हं, वाहनांचा धूर व हवेतील धुळीमुळे डोळ्यांच्या आजारात वाढ झाल्यामुळे नेत्रालयात गर्दी दिसून येत आहे. शहर व तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून उन्ह वाढल्याने तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. सद्या सण-उत्सव, लग्न समारंभाची धावपळ, हवेतील धूळ, धूर, मातीचे बारीक कण अन वाढत्या उन्हामुळे लहान बालकांसह ज्येष्ठ व्यक्ती आजारी पडत आहेत. विशेष म्हणजे डोळ्यांच्या त्रासाच्या रूग्णांची संख्याही अधिक आहे. नेत्ररोग तपासणीसाठी दवाखान्यात गर्दी होत आहे.
शहर व ग्रामीण भागात यावर्षी मार्च व एप्रिल महीन्याच्या पहिल्या आठवड्यातील सरासरी तापमान चाळीशी पार असल्यामुळे उन्हाचा कडाका वाढतच आहे. उन्हाच्या असह्य वेदना होत असल्याने दुपारी रस्ते ओस पडत आहेत. हवेतील धुळीचे कण वाहनाच्या वेगाने पसरू लागल्याने डोळ्यांचे समस्यात वाढ होत आहे. डोळ्यांना जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी दवाखान्यात डोळे तपासणीसाठी गर्दी वाढत चालली आहे. डोळ्याच्या आजारात चुरचुरणे, डोळा दुखणे, अंधारी येणे, अंधुक दिसणे,डोळ्यातून पाणी येणे, डोळा लाल होणे खाज येणे, डोळे कोरडे पडणे, टोचल्या सारखे वाटणे, जळजळ होणे आदी समस्या निर्माण होत आहेत. यावर काही आयड्रॉप्सचाही वापर वाढला आहे.
अशी राखावी निगा
सध्या तापमानात वाढ झाली असून गरजेशिवाय घराबाहेर पडणे जिकिरीचे ठरणार आहे. अतिमहत्वाच्या कामानिमित्त बाहेर जाणे आवश्यक असल्यास प्रखर सूर्यकिरणांपासून डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी बाहेर पडताना उत्तम दर्जाचे गॉगल, छत्री व टोपीचा वापर करावा, स्वच्छ व थंड पाण्याने सतत डोळे धुवावेत, महिलांनी चेहऱ्यावर सौंदर्य प्रसाधने वापरताना डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी, रस्त्यावरील फॅशनेबल गॉगल्स वापरू नयेत. दररोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या, कलिंगड, पपई, गाजर, दूध तसेच रसाळ फळांचा वापर करावा. हेअर डाय वापरतानाही तो चांगल्या प्रतीचा वापरावा, अॅलर्जी टेस्टही करून पाहावी.
वेळीच तज्ञांमार्फत तपासणी करावी
डोळे हा शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आणि वातावरणातील धुळीपासून बचाव होण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी. वाढत्या तापमानाचा परिणाम शरीराबरोबर डोळ्यांसाठी धोकादायक व अपायकारक ठरू शकतो. डोळ्यांबाबत समस्या निर्माण झाल्यास शक्यतो घरगुती उपाय करू नयेत. ते घात ठरू शकतात. डोळ्यांच्या तक्रारीत वाढ होऊन डोळा निकामी होण्याची शक्यता असते. लहानसहान तक्रारीकडे दुर्लक्ष न करता तज्ञांकडून तपासणी करून औषधोपचार व सल्ला घ्यावा.
डॉ. दत्तात्रय खलंगरे, नेत्ररोग तज्ञ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.