आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कार्यालये, शालेय परिसर तंबाखूमुक्तीसाठी समिती ; जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईच्या सूचना

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सोमवारी (दि.१२) जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक पार पडली. बैठकीत शहरातील सर्व शासकीय कार्यालयांचे प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी होते. या बैठकीत तंबाखूमुक्त शासकीय कार्यालये, तंबाखूमुक्त शाळा व तंबाखू विरोधी कायद्यावर चर्चा करण्यात आली.

बेकायदेशीररित्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी पोलिस आणि अन्न व औषधी प्रशासनासोबतच आरोग्य विभागाला एकत्र कार्य करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय व निमशासकीय कार्यालये व परिसर तंबाखूमुक्त ठेवण्याची सर्व विभागप्रमुखांची जबाबदारी राहणार असून त्यानुसार कारवाईचे आदेश दिले. तालुकास्तर व गावपातळीवर तंबाखू नियंत्रण कायदा प्रभावीपणे राबवण्यासाठी तालुकास्तरीय समन्वय समिती आणि गाव पातळीवरील समन्वय समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या.

वरील समितीतील सर्व सदस्य हे तंबाखू नियंत्रण कायद्याच्या अनुषंगाने बैठक घेऊन गाव व तालुक्यातील तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करतील. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, झेडपी सीईओ प्रांजल शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व वैद्यकीय अधीक्षक व इतर कार्यालयीन प्रमुख उपस्थित होते.

नियंत्रणासाठी तालुका, गाव पातळीवर समन्वय समिती तालुकास्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष हे गटविकास अधिकारी असतील, तर सदस्य सचिव हे तालुका आरोग्य अधिकारी असतील. तसेच ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत दंतशल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, एनजीओ प्रतिनिधी व पोलीस उपनिरीक्षक किंवा पोलीस निरीक्षक, मुख्याध्यापक गावातील शाळेच्या समितीमधील सदस्य म्हणून कार्य करतील. गाव पातळीवरील समितीतंर्गत सरपंच अध्यक्ष असतील, प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सदस्य सचिव असतील, शाळेचे मुख्याध्यापक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका सदस्य असतील.

बातम्या आणखी आहेत...