आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हान:पोलिस दलातील दहा पोलिसांविरुद्ध राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

उस्मानाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार आणि पत्रकार सुनील ढेपे यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याप्रकरणी पोलीस दलातील १० कर्मचाऱ्याविरुद्ध राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. २०२० मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान पत्रकाराला पोलिसांनी मारहाण केल्यानंतर पत्रकार ढेपे यांनी सोशल मीडियावर लेख लिहून तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांचे लक्ष वेधले होते.पोस्ट बाळासाहेब सुभेदार यांनी सोशल मीडियावर शेयर केली होती. त्यामुळे पोलिसांनी पत्रकार सुनील ढेपे यांच्यासह सुभेदारविरुद्ध आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये १४ जानेवारी २०२० रोजी पोलीस (अप्रितीची भावना चेतवने) कायदा १९२२ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या एफआयआर आणि चार्जशीटला पत्रकार ढेपे व सुभेदार यांनी ॲड. सुशांत चौधरी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.

न्यायालयाने एफआयआर आणि चार्जशीट रद्दबातल ठरवले तर पोलिसांवर ताशेरे ओढले.दरम्यान, सुभेदार आणि पत्रकार ढेपे यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्याप्रकरणी पोलीस दलातील १० पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

त्यात सायबर पोलीस स्टेशनचे तत्कालीन सपोनि (सध्या तामलवाडी पोलीस स्टेशन) सचिन अशोक पंडित,आनंद नगर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.एस.चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक क्रांती सुधाकर ढाकणे,पो.कॉ.विठ्ठल सुखदेव गरड, पो.कॉ.माधवी म्हाळाप्पा व्हदरगंडे,पो. कॉ.अरविंद अंकुश ढेकणे, पो.कॉ.राहुल नागनाथ नाईकवाडी,पो.कॉ.मनोज महादेव मोरे,पो. कॉ.सुनील सुखदेव मोरे,पो. कॉ.एम. के. कुलकर्णी यांचा समावेश आहे.

तत्कालीन पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या सांगण्यावरून सायबर पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन अशोक पंडित यांनी आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती तर आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस.एस. चव्हाण यांनी गुन्हा नोंद केला होता.बाकी ८ पोलीस कर्मचाऱ्याचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करताना जबाब नोंदवण्यात आले होते.