आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गंधी:झेडपीत स्वच्छता टेंडरवरून बांधकाम-वित्त विभागात धुसफूस; स्वच्छतागृहात दुर्गंधी

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टेंडरअभावी जिल्हा परिषदेतील स्वच्छतागृहाची एक महिन्यापासून सफाई होत नसल्याने कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. बांधकाम विभागाने स्वच्छतेसाठी काढलेल्या टेंडरला वर्क ऑर्डर दिली आहे. मात्र, वित्त विभागाने टेंडरच्या फायलीचा निर्वाळा करताना सलग तीन ते चार वेळा त्रुटी काढल्या आहेत. यामुळे दाेन्ही विभागात धुसफुस सुरू असून सीईओंनी सर्व फाईली मागवल्या आहेत.

जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. दररोज जिल्ह्यातून हजारो नागरिक, माजी पदाधिकारी विविध कामानिमित्त दाखल होतात. यामुळे इमारत परिसर व स्वच्छतागृहाची नियमित सफाई होणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे बांधकाम विभागाने दोन वेळा टेंडर काढले. मात्र, दोन वेळा केवळ दोन निविदा पडल्याने टेंडर तिसऱ्यांदा रिकॉल करावे लागले.

तिसऱ्या वेळी तिघांनी निविदा टाकल्या असून निवडलेल्या निविदेला बांधकाम विभागाने वर्क ऑर्डर दिली आहे. मात्र, टेंडरधारकाच्या फाइलमध्ये अनेक त्रुटी असल्याने वित्त विभागाने तीन ते चार वेळा फाइल बांधकाम विभागाकडे दुरुस्तीसाठी पाठवली आहे. दरम्यानच्या एक महिन्यापासून जिल्हा परिषदेतील स्वच्छतागृहाची सफाई होत नसल्याने स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

यामुळे विविध कार्यालयात व दालनातही दुर्गंधी येत आहे. यामुळे काही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून ओरड होत असल्याने सीईओंनी बांधकाम विभागाशी विचारणा केली, त्यावेळी वित्त व बांधकाम विभागातील धुसफुस समोर आली आहे. या प्रकरणात नेमके काय काळेबेरे आहे का, हे पाण्यासाठी सीईओंनी स्वच्छतेच्या सर्व फाइल मागवल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेत वातावरण चांगलेच तापले आहे.

चार दिवसांत वर्क ऑर्डर काढून स्वच्छता करणार
जिल्हा परिषदेतील स्वच्छतेचे टेंडर दोन वेळा रिकॉल करावे लागले. मागील महिन्यात तिसऱ्यांदा टेंडर काढले आहे. मात्र, वित्त विभागाने काही त्रुटी काढल्या आहेत. टेंडरधारकांचे काम सुरू झाले नाही. चार दिवसांत टेंडरला वर्क ऑर्डर मिळून स्वच्छता होईल. - काळे, शाखा अभियंता.

त्रुटी असलेल्या टेंडरची माहिती घेतो
जिल्हा परिषद इमारत व कार्यालयातील स्वच्छतागृहाची नियमित सफाई गरजेची आहे. बांधकाम विभागाचा विषय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे येतो. तरीही त्रुटी असलेल्या स्वच्छतेच्या टेंडरची माहिती घेतो. -राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद.

अधिकाऱ्यांनी केले हात वर
जिल्हा परिषदेच्या परिसरासह स्वच्छतागृहाच्या सफाईबाबत बांधकाम अधिकारी भोसले यांच्याशी विचारणा केली. मात्र, त्यांनी सबडिव्हिजनला याची माहिती मिळेल, असे सांगून बोलणे टाळले. त्यानंतर सबडिव्हिजनचे शाखा अभियंता काळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी टेंडरच्या फाइलमध्ये वित्त विभागाने त्रुटी काढली असून तुटीची पूर्तता करून चार दिवसांत सफाईचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...