आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार:नियंत्रण महिला सुरक्षेसह कायदा सुव्यवस्था राखण्यास होणार मदत; नळदुर्गवर तिसऱ्या डोळ्याची नजर, ३० ठिकाणी बसवणार सीसीटीव्ही

लतीफ शेख | नळदुर्ग6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपरिषदेच्या वतीने नळदुर्ग शहरातील प्रमुख रस्ते व चौकांसह ३० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे नळदुर्गकर आता लवकरच तिसऱ्या डोळ्याच्या नजरेखाली येणार आहेत. या सीसीटीव्हींचे नियंत्रण पोलिस प्रशासनाच्या हातात राहणार आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतूक, चोऱ्या, छेडछाड, हाणामारीच्या घटनांसह गुन्हेगारी रोखण्यासाठी मदत होणार आहे.

येथील ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसह बाहेरुन येणाऱ्यांना शहराचे मुख्य द्वार म्हणजे बाजार लाइनमधून किल्ल्याकडे जाणाऱ्या रोडवर ठिकठिकाणी दुचाकीस्वार व चारचाकी वाहने बेशिस्तपणे लावलेली असल्याने अडचणीला तोंड द्यावे लागते. बेशिस्त पार्किंगमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच शहरात कोणतीही अप्रिय घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नळदुर्ग नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. लहान व मध्यम शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (जिल्हा स्तरावर राबवण्यात येणाऱ्या) योजनेंतर्गत १५ लाखांचा निधी खर्च करुन शहरातील किल्ला गेट, हजरत सादिक शहा वल्ली चौक, क्रांती चौक, चावडी चौक, भवानी चौक, शास्त्री चौक, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, लोकमान्य वाचनालय ते बस स्थानकाकडे जाणाऱ्या रोडवर आणि किल्ला गेट ते नानीमाँ दर्गाह रोड, किल्ला गेट ते कुरेशी गल्ली रोड, तसेच किल्ला गेट ते नगरपालिका मार्गाने माऊली नगर भागात जाणाऱ्या रस्त्यावर, असे एकूण ३० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

लवकरच काम सुरू: शहरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम दोन दिवसांनी सुरू होणार आहे. परंतु नळदुर्गचा विचार केल्यास कॅमेरांची ३० ही संख्या अपूरी आहे. कारण ३० हजार लोकसंख्येच्या नळदुर्गची हद्दवाढ झाली असून वसाहती वाढल्या आहेत. शहरात मोठ्या शाळा व महाविद्यालये असल्याने परिसरासह ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींचे प्रमाण अधिक आहे. शाळा, महाविद्यालयाचा परिसर असलेल्या अक्कलकोट रोड, रहिम नगर रोड, बौद्ध नगर रोड, बसस्थानक परिसर, व्यास नगर मार्गाने बालाघाट कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर टवाळखोरांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यामुळे अशा ठिकाणी तत्काळ सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे.

कंट्रोल रुममधून नियंत्रण
पालिकेच्या वतीने शहरात बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्हींचे नियंत्रण पोलिस प्रशासनाच्या हातात राहणार आहे. त्यासाठी पोलिस कंट्रोल रुम तयार करुन पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील सुरक्षितता व कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार.
सिद्धेश्वर गोरे, सहायक पोलिस निरीक्षक, नळदुर्ग.

संबंधित खात्याकडे प्रस्ताव
नळदुर्गमधील प्रत्येक रोड व चौकात ३० बुलेट सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधीत खात्याकडे ७० लाखांच्या निधीसाठी प्रस्ताव दाखल केला असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल. त्यानंतर संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे.
लक्ष्मण कुंभार, मुख्याधिकारी, नगरपरिषद, नळदुर्ग.

पालिका, पोलिस प्रशासनाचा पाठपुरावा
नळदुर्ग पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार व पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी शहराच्या सुरक्षेविषयी विचार विनिमय करून सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्यामार्फत सीसीटीव्हीसाठी निधी मिळण्याकरिता पाठपुरावा केला. त्याला यश आले व जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी १५ लाखांची निधी मंजूर झाला.

बातम्या आणखी आहेत...