आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाची दुसरी लाट ज्या पध्दतीने वेगवान झाली, त्याचा अंदाज कुणीही लावू शकत नाही. ही लाट कधी संपणार, हे अजूनही निश्चितपणे सांगता येत नसले तरी लाटेने अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक कसे सैरभैर झाले आहेत,जिल्हा कोविड रुग्णालयात कशी भयग्रस्त, भयानक आणि गोंधळाची परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत आपल्याला कोविड होऊच नये, झालाच तर या वातावरणात येण्याची वेळ येऊ नये, घरातच मेलेलं बरं, अशी भयग्रस्त भावना उस्मानाबादचे ज्येष्ठ पत्रकार संजय पाटोळे यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा कोविड रुग्णालयाला गुरुवारी भेट दिल्यानंतर आलेला अनुभव मांडला आहे.
400 पेक्षा अधिक गंभीर रुग्ण, रोज 10 पेक्षा जास्त मृत्यू
जिल्ह्याचे कोविड रुग्णालय असलेल्या ठिकाणी सध्या 400 पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या रूग्णालयात दरराेज किमान 10 पेक्षा अधिक रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीत कधी नातेवाईकांची आक्रोश, कधी जीव वाचविण्यासाठी सुरू असलेली पळापळ, कधी गोंधळलेले कर्मचारी, अधिकारी, असे एकंदर चित्र दिसत आहे. एक दिवसाची ही परिस्थिती नाही तर दररोजचा आक्रोश, किंकाळ्या आणि आरोळ्या सुरूच आहेत. त्यामुळे या परिसरात गेलेल्या पाषाणहृदयी पुरुषालाही भयकंप सुटावा, अशी परिस्थिती आहे. मात्र, परिस्थिती आता हाताबाहेर गेलीय, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा, बेड, ऑक्सिजन साऱ्या साधन-सुविधा अपुऱ्या पडत आहेत.
पत्रकार पाटोळे म्हणतात, एका जवळच्या मित्राच्या कोरोना पॉझिटिव्ह व 60 ते 70 ऑक्सिजन स्तर असलेल्या आत्त्याला उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजन मिळत नसल्याचा मुंबईहुन फोन आला. योगा-योगाने मी गावाकडून उस्मानाबादलाच निघालो होतो. गेल्या एका महिन्यापासून जिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभारामुळे "कोरोना ग्रस्तरुग्णांचे वाढते मृत्यूचे प्रमाण, "अंत्यसंस्कारास सुद्धा वेटींग, अशा मथळ्याच्या, आशयाच्या बातम्या वाचत होतो, पाहत होतो.
रुग्णांच्या नातेवाइकांचा संताप, हतबल पोलिस
मित्राच्या विनंतीवरून सकाळी साडे अकराच्या सुमारास जेव्हा जिल्हा रुग्णालयात गेलो. नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वार परिसरात एका झाडाच्या सावलीत हतबल ड्युटी बजावत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसी फौजफाटा उभा होता. सायरन वाजवत येणाऱ्या रुग्णवाहिका, बेड मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा आकांत, निधन झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश, रुग्णालयाच्या त्या एकाच गेटसमोर लोकांची गर्दी, त्याच गेटमधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा प्रवेश आणि कोरोनामुळे निधन झालेले मृतदेह शवागृहाकडे घेऊन जाणारे सेवक, भुकेल्या नातेवाईकांना अन्नदान करणारे स्वयंसेवक, नियोजनशुन्य प्रशासनामुळे ताणतणावात वावरणारे गोंधळून गेलेले आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांना गावगुंडासारखे हाकलणारे भावनाशून्य उर्मट पोलिस उपनिरीक्षक नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली असलेली पोलिसांची टोळी!
हे सगळं भयाण दृश्य पाहून मला देखील क्षणभर वाटलं, एक तर आपल्याला कोरोना होऊ नये आणि झालाच तर घरातच सडून मेलेलं परवडेल! या यातना भोगायची वेळ नको. हे सगळं भयाण दृश्य पाहून स्वतःला स्वतःचा रागही आला आणि अशा व्यवस्थापनाची चीडही आली.
हे तर रोजचंच आहे
पाटोळे म्हणाले, या परिस्थितीबाबत आरोग्य कर्मचारी असलेल्या एका मित्राकडून सहज माहिती घेतली, तर हे रोजचचं आहे. हे उत्तर ऐकून मलाही थोडं गरगरल्यासारखं झालं. बधीर होत चाललेलं माझं मन मलाच प्रश्न करू लागलं. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत किती लोक तडफडून मेले असतील, आपल्या जिल्हाधिकारी महोदयांनी एक माणूस म्हणून आतापर्यंत मृत्यू रोखण्यासाठी काय नियोजन केले?
पालकमंत्री महोदयांचं काही नियोजनाचं पालकत्व आहे का नाही, आपले खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधी एवढी लोकं डोळ्यादेखत मरत असताना सुस्त, गप्प का आहेत, हतबल नागरिकांनी आता जाब कुणाला विचारायचा.
गेल्यावर्षी दीपा मुधोळ जिल्हाधिकारी म्हणुन कार्यरत असताना कोरोनाच्या पहिल्या लाटेत मे 2020 पर्यंत जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नव्हता. याचेच आपण कौतुक करवून घेतले होते. आता उस्मानाबाद जिल्हा रुग्ण संख्येत, मृत्यूदरात महाराष्ट्रात 6-7 व्या क्रमांकावर? मग चुकलंय, चुकतंय कुणाचं, प्रशासनाचं, आरोग्य यंत्रणेचं, लोकप्रतिनिधींचं, का निष्काळजी-भेकड- हतबल नागरिक म्हणून आपलंच? म्हणून आपणच आपली काळजी घ्या, आपला जीव वाचवा आणि जमलंच तर थोडीशी माणुसकी वाचवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.