आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी:कोर्टाचे आदेश, विम्याचे 150 कोटी पाच दिवसांत जमा करा

उस्मानाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाचे बजाज अलायंझ विमा कंपनीला खरीप २०२० च्या विम्यापोटी १५० कोटी रुपये २५ नोव्हेंबरपर्यंत उच्च न्यायालयात जमा करण्याचे तसेच दहा दिवसात शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुढील सुनावणी होणार आहे.

खरीप २०२० मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीपोटी तीन आठवड्यात भरपाई देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे बजाज अलायंझ जनरल इन्शुरन्स कंपनी विरोधात याचिकाकर्ते प्रशांत लोमटे यांच्यासह राज्य सरकारने अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. सुधांशु चौधरी यांनी विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयाच्या दि. ५ सप्टेंबरच्या आदेशाचे अडीच महिने होवून देखील पूर्णतः पालन केले नाही व अवमान केला आहे. विमा कंपनीला ३४४ कोटी तातडीने जमा करण्याचे आदेश देण्याची विनंती केली.

यावर विमा कंपनीच्या वतीने ॲड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने अवमान याचिकेची नोटीस काढू नये, अशी विनंती करत तातडीने शपथपत्र दाखल करण्यासह दि. २५ नोव्हेंबरपर्यंत १५० कोटी उच्च न्यायालयात जमा करण्यास परवानगी देण्याची विनंती केली. याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. चौधरी यांनी १५० कोटी जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा करण्याबाबत आदेश देण्याची विनंती केली. यावर ही रक्कम आधी उच्च न्यायालयात जमा होऊ दे व विमा कंपनीचे शपथपत्र दाखल झाल्यावर याचा याचिकाकर्त्यांनाच उपयोग होइल असे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यावर पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...