आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ विचारवंत कादरी यांचे विचार:समाजप्रबोधनासाठी साहित्य निर्मिती करणे हे शिक्षणामुळेच शक्य

उमरगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणामुळेच व्यक्तिमत्व विकास होतो. समाज प्रबोधनासाठी साहित्य निर्मिती करणे शिक्षणामुळेच शक्य होते. जगणं सुंदर करायचे असेल तर साहित्य निर्मिती करा. आपल्याकडे कांहीही नसल्याचे दुःख चघळत बसण्या पेक्षा आपल्याकडे असलेल्या उत्कृष्ट कर्तव्याचा उत्सव, सण म्हणून दररोज साजरा करा असे आवाहन अहमदपूर येथील ज्येष्ठ विचारवंत मोहीब कादरी यांनी व्यक्त केले.उमरगा श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा जेष्ठ साहित्यिक भाऊराव सोमवंशी यांचे लिखित “गतीमान शिक्षणातून समाज प्रबोधन” या पुस्तकाचे प्रकाशन आदर्श महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाले तेंव्हा कादरी बोलत होते.वळंबाकार साहित्यीक शिवमूर्ती भांडेकर अध्यक्षस्थानी होते.यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्रा. किरण सगर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दिलीप गरूड, सुभाष वैरागकर, प्राचार्य सोमशंकर महाजन, प्रा. प्रभाकर कांबळे, उपप्राचार्या संध्या सगर, प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, प्राचार्य भीमाशंकर सारणे, कवी कमलाकर भोसले, ललिता सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना कादरी म्हणाले की,जगणं सुंदर आहे अभिमानाने जगता आले पाहिजे. कष्टातून मिळविलेल्या संपत्ती व साहित्यातून उभारलेली संपत्ती कधीही श्रेष्ठ असते. साहित्य निर्मिती हा समाज मनाचा आरसा आहे. उत्कृष्ट साहित्य निर्मिती करुन समाज निर्मिती करा असे आवाहन केले. यावेळी सुभाष वैरागकर, प्रा. सगर यांची भाषणे झाली.

प्राचार्य डॉ. दिलीप गरूड म्हणाले की,बदलत्या शैक्षणिक धोरणाचे उंबरठ्यावर साहित्यिक भाऊराव सोमवंशी यांनी गतीमान शिक्षणातून समाज प्रबोधन साहित्य कृतीची निर्मिती केली आहे. त्यांचे हे साहित्य नवीन शैक्षणिक धोरणा करिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे ज्ञानाच्या विविध शाखा निर्माण होणार आहेत. प्रत्येकाला आपल्या आवडी प्रमाणे मुक्त शिक्षण घेणे सोयीचे होणार असून सोमवंशी यांची साहित्यकृती नक्कीच सामाजिक परिवर्तन घडवेल असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ सुरेश कुलकर्णी यांनी केले. प्रा लक्ष्मण बिराजदार सुत्रसंचालन केले. प्रा डॉ बालाजी मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, साहित्यप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक शिवमुर्ती भांडेकर म्हणाले की, भाऊराव सोमवंशी यांची साहित्यकृती प्रज्ञा, शिल, करुणा या तत्वावर आधारीत आहे. माणसा माणसांच्या मनामना मधील वाढत जाणारे अंतर कमी करणारी साहित्य निर्मिती सोमवंशी यांनी केली आहे. साहित्य हे सामाजिक प्रबोधन संशोधनाचे साधन असल्याने वाचनसंस्कृतीवाढवून साहित्य निर्मितीची जपणूक करा.

बातम्या आणखी आहेत...