आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारीचे प्रमाण वाढत:कळंबमध्ये गुन्हेगारी वाढली, नूतन पोलिस निरीक्षकांसमोर आव्हान

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून दोन दिवसापूर्वी हॉटेल सम्राटच्या मालकास मारहाण करून गुन्हेगारांनी पोलिसांवर हल्ला केला. तसेच काही दिवसांपूर्वी कळंबमध्ये दोन गटात फिल्मी स्टाइलने हाणामारी झाली असून त्यातील एकाने पोलिसांवर हल्ला केला होता, अशा घटना दिवसेंदिवस वाढत असून पुन्हा कळंब शहर गुन्हेगारीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या गुन्हेगारीवर अंकुश घालण्याचे आवाहन नूतन पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या समोर उभे आहे.

राज्यात कोठेही चोरीसह अन्य अनुचित घटना घडली की, अगोदर कळंब शहरात पडसाद उमटत होते. त्यामुळे कळंब शहर संवेदनशील झाले होते. वरिष्ठ स्तरावरील कळंबकडे बारिक लक्ष ठेऊन होते. वारंवार शहरात गोंधळ होत असल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे शहरात कोणी नवीन व्यवसाय टाकण्यास धजत नव्हते, कालांतराने पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना टार्गेट करून हद्दपार केले. त्यामुळे गुन्हेगारीवर अंकुश बसला होता. शहरातील नागरिक स्वताला सुरक्षित समजु लागले होते.

मात्र, पुन्हा आता शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. त्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून नूतन पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी गुंडगिरीला आळा घालण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे. कळंब शहरात भांडणाचे प्रमाण कमी झाले होते, मागील काही दिवसापुर्वी शहरात दोन गटात भरचौकात फिल्मी स्टाइलने भांडण झाले होते. यामध्ये एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांवर हल्ले, नागरिक चिंतेत
दोन दिवसापूर्वी हॉटेल सम्राटच्या मालकास मारहाण झाली होती. या भांडणातील लोकांना सहायक पोलिस निरीक्षक कल्याण नेहरकर व अन्य एक कर्मचारी या लोकांना पकडण्यासाठी गेले असता. त्यांच्यावर त्या लोकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आता पोलिसांवर हल्ला होत असल्याने नागरिक कसे सुरक्षित राहतील, असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जात आहे.

बंदोबस्त वाढवण्याची मागणी
सध्या युवक हे व्यसनाकडे आकर्षित होत आहे. व्यसनाधीनतेतून कळंबमध्ये भांडण करणाऱ्यांचे कळंब युवक ग्रुपने काही उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी याकडे लक्ष देऊन रात्रीच्या वेळी शहरातील मुख्य चौकात पोलिस कर्मचारी ठेवण्याची मागणी नागरिकातून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...