आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॅलो, महावितरण हेल्पलाइन आमच्या भागात वीज बंद पडली तत्काळ चालू करा, अशी विनवणी करणारे दोनशे पेक्षा अधिक कॉल महावितरणच्या हेल्पलाइनवर खणाणले. परंतु, कर्मचारी नाहीत आम्ही काही करू शकत नाही, पर्याय नाही, असे उत्तर सर्वांनाच ऐकावे लागत होते. महावितरणने कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली हेल्पलाइन व यंत्रणा पहिल्याच दिवशी निष्प्रभ ठरली. मंगळवारी रात्री बंद पडलेली विज सुरू करण्यासाठी महावितरण ला बुधवारची सायंकाळ उजाडली.
दरम्यान, संप मिटल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. खासगी कंपनीला वीज पुरवठ्यासाठी परवाना देऊ नये. यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी रात्रीपासून महावितरणच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी राज्यस्तरीय संप पुकारला. यात जिल्ह्यातील ९५ टक्के कर्मचारी अधिकाऱ्यांनी सहभागी होत पाठिंबा दिला. परंतु, शहरातील अनेक भागात मंगळवारी रात्री तसेच बुधवारी सकाळी वीज पुरवठा बंद झाला. पुरवठा सुरु करण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने दुरुस्ती करण्यासाठीही कर्मचारी उपलब्ध नव्हते.
यामुळे महावितरण सांगितलेल्या हेल्पलाइनवर सातत्याने कॉल जात होते. कर्मचारी दिवसभर नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं देत तांत्रिक कर्मचारी कामावर नसल्याने हतबल झाल्याचे दिसून आले. नागरिक अत्यंत आर्तपणे वीज सुरू करण्याची मागणी करत होते. त्यापेक्षाही अधिक निराशेने हेल्पलाइन वरील वीज कर्मचारी हतबलता दाखवत होते. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी शहरातील काही भागात दुपारचे तीन वाजले तर काही ठिकाणी बुधवारची सायंकाळ उजाडली. पहिल्याच दिवशी अशी अवस्था झाल्यामुळे शहरातील नागरिक सातत्याने संप मिटावा म्हणून अपेक्षा करत होते.
त्यानुसार संप मिटल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. अधिक्षक अभियंता हे उपकेंद्रात ठाण मांडून होते. जिथे आंदोलन करण्यात आले तेथे मंडपामध्ये जनरेटरव्दारे वीज पुरविण्यात आली. भागात मंगळवारी रात्री वीज बंद पडल्यामुळे आरओ प्लांट बंद पडले. यामुळे पाण्याचे शुद्धीकरण झाले नाही.
आंदोलन दृष्टिक्षेपात
जिल्ह्यातील सर्व प्रकारचे ९५ टक्के कर्मचारी संपामध्ये सहभागी असल्याची नोंद. जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी. ८० अभियंता, ८०० लाईनमन, ऑपरेटरसह सर्व लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचा आंदोलनामध्ये सहभाग. महावितरण कर्मचाऱ्यांच्या विविध ३० संघटनांचा आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग ग्रामीण भागात अनेक कर्मचाऱ्यांनी नागरिकांना खासगीकरणाचे तोटे समजावून सांगितले.
महावितरणसह, सरकारी कार्यालयही अंधारात
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालयासह न्यायालय परिसरात ही काही काळ वीज बंद होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत एवढेच नव्हे तर महावितरणच्या जिल्हा कार्यालयातही अंधार निर्माण झाला होता. महावितरणचे कर्मचारी संपामुळे तर अन्य कार्यालयातील कर्मचारी अंधार असल्यामुळे बाहेरच रेंगाळत होते. संगणक प्रणाली बंद असल्यामुळे काम करता येत नव्हते.
झेरॉक्स प्रत तब्बल चार रुपयाला,जनरेटवर काम
जिल्हा न्यायालयाच्या परिसरात वीज बंद असल्यामुळे अनेक दुकानांमध्ये जनित्रांच्या माध्यमातून काम सुरू ठेवण्यात आले होते. न्यायालयीन कामकाजासाठी झेरॉक्स प्रत आवश्यक असते. यामुळे ती काढण्यासाठी इतर वेळी एक रुपया शुल्क असते. परंतु, बुधवारी यासाठी चार रुपये आकारले जात होते. तसेच संगणकावर टंकलेखन केलेली एक प्रत काढण्यासाठीही अन्य वेळेपेक्षा दुप्पट शुल्क घेतले जात होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.