आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील कटारे स्पिनिंग मिलच्या कामगारांनी सुत मिल समोर बुधवार दि.१ फेब्रुवारी पासून चक्री उपोषण सुरु केले असून २०१९ पासून ग्रॅज्युएटी रक्कम मिळत नसल्यामुळे कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तामलवाडी पंचक्रोशीत वरदायनी ठरलेल्या कटारे स्पिनिंग मिलची ३५ वर्षापूर्वी सोलापूरच्या कटारे उद्योग समूहाने स्थापना केली होती. सुरुवातीच्या कालावधी मध्ये या कटारे स्पिनींग मिलमध्ये तीन शिप्टमध्ये १५०० कामगार काम करत होते. त्यामुळे या परिसरात आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर झाली होती.
मात्र, आर्थिक मंदीचा फटका बसल्यामुळे ही सूतगिरणी बंद करण्यात आली आहे. यामुळे येथील कामगारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यातच कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगारांची उपदेयक थकवल्याने कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रॅज्युएटी रक्कम मिळत नसल्यामुळे कामगारांनी कंपनी मालकाविरुद्ध कामगार न्यायालयात खटला दाखल केला होता. याचा निकाल कामगारांच्या बाजूने लागला असतानाही मालक देयक देत नसल्यामुळे येथील तीनशे कामगारांनी सूत मिलसमोर चक्री उपोषण सुरु केले आहे. यासंदर्भात कटारे स्पिनिंग मिल चे मालक किशोर कटारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
आंदोलनाचा निर्धार
जो पर्यंत आमच्या हक्काची ग्रॅज्युएटी रक्कम मिळत नाही तिथं पर्यंत आमचे चक्री उपोषण सुरुच राहणार आहे. आम्ही सगळे कामगार पाळी-पाळीने बसणार आहोत. शाहिर गायकवाड, कामगार संघटना अध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.